बुधवारी झाली मडगाव गटाची बैठक
प्रतिनिधी / मडगाव
मडगावचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा मध्यतरी बरीच गाजली होती. मात्र, दिगंबर कामत यांनी स्पष्ट शब्दात या वृत्ताचा इन्कार केला होता. तरी सुद्धा बुधवारी झालेल्या मडगाव गट काँग्रेसच्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी दिगंबर कामत जो निर्णय घेतील, त्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देण्याच्या भावना व्यक्त केल्याने, दिगंबर कामत यांच्या भाजप प्रवेशाबद्दलची चर्चा पुन्हा रंगात आली आहे.
दिगंबर कामत यांनी काल गुरूवारी सकाळी दिल्ली भेटीवर गेले आहेत. मात्र, ते आपल्या खाजगी भेटीवर दिल्लीत गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांचा या दिल्ली भेटीचा काहीही राजकीय संदर्भ नसल्याचे सांगण्यात आले. दिल्लीहून श्री. कामत हे इंदोरच्या दौऱयावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बुधवारी मडगाव गट काँग्रेस समितीने दिगंबर कामत हे सलग आठ वेळा मडगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक निकालानंतर मडगाव गट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची व आमदार दिगंबर कामत यांची बैठक झाली नव्हती. ही बैठक बुधवारी घेण्यात आली. या बैठकीला कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत श्री. कामत यांच्या अनेक खद्दे समर्थकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना, जो निर्णय श्री. कामत घेतील, त्या निर्णयामागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला. काँग्रेस पक्षाचे 16 आमदार पक्ष सोडून गेले व दिगंबर कामत हे एकटेच पक्षात राहिले व त्यांनी पक्षाची धुरा सांभाळताना एका आमदारावरून अकरा आमदार निवडून आणले, जेव्हा विरोधी पक्ष नेता निवडताना किंवा अन्य महत्वपूर्ण निर्णय घेताना श्री. कामत यांना विश्वासात न घेतल्याने, कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपण जो काही निर्णय घेईल, तो कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेणार असल्याचे श्री. कामत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
सर्व काही दिल्लीत-तानावडे
दरम्यान, दिगंबर कामत व विजय सरदेसाई हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सद्या सुरू आहे. या संदर्भात प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याशी संपर्क साधला असता, श्री. तानावडे म्हणाले की, दिगंबर कामत व विजय सरदेसाई यांच्या भाजप प्रवेशासंदर्भातील चर्चा ही दिल्लीत झालेली होती. स्थानिक पातळीवर त्या संदर्भात कोणतीच चर्चा झालेली नाही.
आपल्याला जी माहिती उलपब्ध झालेली आहे, त्या प्रमाणे दिगंबर कामत व विजय सरदेसाई हे भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात होते. त्यांनी स्थानिक पातळीवर संपर्क साधलेला नाही. श्री. कामत यांच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चा सुरू असली तरी विजय सरदेसाई यांच्या बद्दलच्या चर्चेला पूर्णविराम देण्यात आलेला आहे.