ऑस्कर पुरस्कार विजेत्या लघु माहितीपट निर्मितीची कथाही रंजक
अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये नुकत्याच झालेल्या 95 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात म्हणजेच ‘ऑस्कर 2023’मध्ये भारताचा जलवा दिसून आला. ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ‘बेस्ट ओरिजनल साँग’ या
श्रेणीमध्ये ऑस्कर पुरस्कार पटकावत देशाचा नावलौकिक वाढविला. दुसरीकडे, तामिळी भाषेतील माहितीपट ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या लघु माहितीपटानेही ऑस्करला गवसणी घातल्याने भारतीयांचा आनंद ‘द्वि’गुणीत झाला. निर्माते गुनीत मोंगा आणि दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस यांच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला सध्या भारतीय रसिकांची भरभरून दाद मिळत असून या माहितीपटाची निर्मितीकथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच अनुषंगाने या माहितीपटाचा घेतलेला आढावा…
भारतीय डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आणि छायाचित्रकार कार्तिकी गोन्साल्विस यांच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ऑस्कर सोहळ्यात ‘नाटू-नाटू’ या गाण्याला पुरस्कार मिळण्याची दाट शक्मयता आधीपासूनच होती. कारण या चित्रपटाला यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पण ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने ऑस्कर जिंकल्याबद्दल भारतीय सिनेरसिक आनंदित होण्याबरोबरच आश्चर्यचकितही झाले आहेत. अनेकांनी ‘द एलिफंट व्हिस्परर्स’चे नाव शॉर्टलिस्ट होऊन ऑस्करसाठी नामांकन झाल्यावरच प्रथमच ऐकले होते. ऑस्करसाठी निवड होताच नेटफ्लिक्सवर मोठ्या संख्येने लोकांनी तो पाहिला. त्यानंतर आता पुरस्कार प्राप्त होताच या माहितीपटाची जगभर चर्चा सुरू झाली आहे.


काय आहे ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ची कथा
‘द एलिफंट व्हिस्परर्स’ हा तामिळी भाषेतील डॉक्मयुमेंटरी चित्रपट आहे. केवळ 39 मिनिटांचा हा लघु माहितीपट 8 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. ओटीटी नेटफ्लिक्सवर हा माहितीपट उपलब्ध आहे. पिढ्यान्पिढ्या हत्तींसोबत काम करणाऱ्या आणि जंगलाच्या गरजा जाणून घेणाऱ्या लोकांची ही कथा आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ही बोम्मन आणि बेल्ली नावाच्या स्थानिक जोडप्याची कथा असून तामिळनाडूमधील मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पात रघु या अनाथ हत्तीला सांभाळतात. सर्व अडचणींना तोंड देत ते रघुची काळजी घेत असल्यामुळे या जोडप्यामध्ये आणि रघू हत्तीमध्ये एक मजबूत बंध तयार होतो. भारतीय कुटुंब आणि अनाथ हत्ती यांचे जबरदस्त बॉन्डिंग माहितीपटात दाखवण्यात आले आहे. हा माहितीपट मानवांचे हत्ती आणि इतर प्राण्यांशी असलेले नाते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतो. याशिवाय तामिळनाडूच्या मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाचे नैसर्गिक सौंदर्यही चित्रपटात पाहायला मिळते. यासोबतच निसर्गाशी एकरुप होणाऱ्या आदिवासींच्या जीवनावरही हा माहितीपट प्रकाशझोत टाकतो. त्यामुळे ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ म्हणजे केवळ प्राणी-मानव यांच्यातील नात्याची हृदयस्पर्शी कथा नसून भारतीय संस्कृती आणि पर्यावरण संरक्षणाची परंपरादेखील दर्शवितो.
‘द एलिफंट व्हिस्परर्स’ हा केवळ 39 मिनिटांचा माहितीपट आहे, परंतु निर्मात्यांना तो बनवण्यासाठी खूप मेहनत आणि वेळ द्यावा लागला. या माहितीपटाच्या दिग्दर्शक कार्तिकी गोन्साल्विस यांनी हा चित्रपट बनवण्यात आपल्या आयुष्यातील महत्त्वाची पाच वर्षे खर्ची घातली. हत्तींबद्दल माहिती गोळा करण्यासाठी आणि त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी त्या स्वत: सुमारे दीड वर्षांपासून जंगलात राहिल्या आहेत. तामिळनाडूतील मुदुमलाई नॅशनल पार्कमध्ये या माहितीपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. यासाठी कार्तिकी गोन्साल्विस 2017 मध्ये आपल्या टीमसोबत तेथे पोहोचल्या होत्या. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्षपणे तेथील वेगवेगळे शॉट्स आणि छायाचित्रे घेतली. पर्यावरण संरक्षण, निसर्ग आणि वन्यजीव सुंदरपणे आपल्या चित्रपटात मांडणे हा कार्तिकी यांचा मुख्य उद्देश होता. आपला उद्देश साध्य करण्यासाठी त्यांनी बोम्मन आणि बेल्ली या आदिवासी जोडप्यासह रघू आणि अम्मू नावाच्या दोन हत्तींसोबत दिवसामागून दिवस घालवावे लागले.


भावनांचे प्रतिबिंब ‘जशास तसे’
वन्यजीवांवर आधारित बहुतेक चित्रपट हे मानव आणि प्राणी यांच्यातील नातेसंबंधांवर प्रकाश टाकतात. अशा चित्रपटांमध्ये मानव जंगल आणि वन्य प्राण्यांची कशी हानी करतो, हे दाखवले जाते. मात्र, ‘द एलिफंट व्हिस्परर्स’मध्ये मानव आणि प्राणी या दोघांच्याही भावनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यातही हत्ती आणि इतर प्राण्यांसोबत शतकानुशतके वास्तव्य करणाऱ्या आदिवासी लोकांच्या परिश्रमांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. बोम्मन हा पिढीजात माहुत आणि पुजारी सुद्धा आहे. हत्तीची सेवा म्हणजे आपण साक्षात श्री गणेशाची आराधना करतो अशी त्याची भावना आहे. या भावनेचे प्रतिबिंब त्याच्या प्रत्येक कृतीत दिसते शिवाय त्याच्यातील वात्सल्यभाव या चित्रपटाच्या चित्रीकरणातून उलगडून दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. बेल्लीच्या मुलीचे अकाली निधन झाले आहे. तिला या पिल्लू हत्तीमुळे आपली कन्या गवसली आहे. आपल्या मुलीचा हा पुनर्जन्म आहे अशा भावनेने ती या हत्तीशी एकरूप झालेली होती. तिच्या भाव-भावना, सुख-दु:ख न बोलताही या हत्तीला समजतात म्हणजेच हत्ती सुद्धा मानवी भावनांची किती एकरूप होऊ शकतात याचे सूक्ष्म चित्रण या चित्रपटात दिसते. बेल्लीची नात सुद्धा या माहितीपटाचा भाग झालेली असल्याने त्यांच्या जीवनाशी सुद्धा प्रेक्षक एकरूप होतात.


दृश्यांमधील जीवंतपणा टिपण्याची किमया
‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटात कोणतीही लिखित कथा नाही. पण रघू आणि अम्मूचे बोम्मन-बेल्ली यांच्याशी खरे नाते दाखवण्यात आले आहे. बोम्मन आणि बेल्ली या दोघांनाही हत्ती आपल्या मुलांप्रमाणे आवडत होते. दोन्ही हत्तीही त्यांना आपला पालक मानून त्यांच्यावर प्रेम करत होते. यामध्ये हत्ती किंवा जोडप्याला कसलेही प्रशिक्षण दिले गेले नाही. कार्तिकी गोन्साल्विस यांची टीम आपापसात चर्चा करून विविध फुटेज बनवत गेले. अनेकवेळा आपले व्हिडिओ बनवले जात असल्याची माहितीही बोम्मन-बेल्ली यांना समजत नव्हती. त्यामुळे माहितीपटात अधिकाधिक जिवंतपणा आला आहे.
मानव-प्राणी यांच्यातील ऋणानुबंध
तामिळनाडूमध्ये मुदुमलाई म्हणून जंगली हत्तींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या जंगलातील हत्तींची आई म्हणून प्रसिद्ध असणारी स्री बेल्ली आणि माहूत बोम्मन यांच्या जीवनाचा हा माहितीपट आहे. हे आदिवासी जोडपे हत्तींच्या महिनाभर वयाच्या कळपातून हरवलेल्या पिल्लांचा सांभाळ करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कळपापासून हरवलेल्या बाळहत्तींचा आत्मियतेने सांभाळ करणारे आणि त्यांच्याशी हितगूज करत त्यांना लहानाचे मोठे करणारे बेल्ली आणि बोम्मन या हत्तींशी कसे वागतात, त्यांचे नखरे कसे झेलतात, त्यांचे ऊसवे-फुगवे, आजारपण ते कसे काढतात याची माहिती या 39 मिनिटांच्या माहिपटातून जगासमोर आणली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील माणसाचे मन हळवे करणारा हा माहितीपट आहे. एकूणच हा माहितीपट कधी एक व्यापक जीवनपट बनून जातो याची जाणीव ही राहत नाही प्रेक्षकसुद्धा त्या जंगलाचा आणि तेथील मानवी जीवनाचा भाग बनून जातात. हत्तींचे मानवी वस्तीवर होणाऱ्या आक्रमण आणि मानवाला होणाऱ्या त्रासाबद्दल खूप बोलले जाते. मात्र हे का घडते आणि यावर काय मार्ग काढता येऊ शकेल या दृष्टीने माणसांना विचार प्रवण करण्यासही हा माहितीपट योगदान देतो. मात्र आपण तसा काही संदेश देत आहोत असा आव न आणता सहजपणाने हे कार्यही साध्य झाले आहे, हे महत्त्वाचे.
तामिळनाडू सरकारकडूनही दखल
द एलिफंट व्हिस्परर्स’ या ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंट्री चित्रपटातील सहभागींचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्टॅलिन यांनी त्यांना प्रत्येकी एक लाख ऊपयांचे धनादेश, ढाल आणि शाल प्रदान केली. यावेळी स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री निधीतून सर्व 91 माहूत आणि कावड्यांना (माहुतांचे सहाय्यक) प्रत्येकी एक लाख ऊपये अनुदान देण्याचीही घोषणा केली. तसेच हत्तींच्या देखभालीचे काम करणाऱ्यांसाठी पर्यावरणपूरक घरे बांधण्यासाठी 9.10 कोटी ऊपयांचा निधी जाहीर केला. इतकेच नाही तर सरकारने अनामलाई व्याघ्र प्रकल्पातील कोझिकामुठी हत्तींच्या छावणीच्या सुधारणांसाठी 5 कोटी ऊपये मंजूर केले. याशिवाय आठ कोटी ऊपये खर्चून हत्तींच्या देखभालीसाठी कोईम्बतूरमधील सादिव्याल येथे नवीन हत्ती छावणी उभारण्याची घोषणा केली आहे.


प्रशिक्षित हत्तींची गरज
देशातील विविध भागांमध्ये जंगली हत्ती शेती-बागायतीत घुसखोरी करत नुकसान करतात. माणसांवर हल्ले करतात. वाढत्या लोकसंख्येमुळे हत्तींचे अधिवास क्षेत्र कमी होत असल्याने ते अनेकदा मानवी वस्तीत प्रवेश करतात. त्यामुळे मनुष्य-प्राणी संघर्ष निर्माण होतो. अशा हत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी खास प्रशिक्षित हत्तींची गरज भासते. देशभरात अशा काही छावण्या आहेत की जेथे या हत्तींना प्रशिक्षण दिले जाते. तामिळनाडूच्या अनामलाई व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील कोझिकामुथी एलिफंट कॅम्प हा असाच एक कॅम्प आहे. छावणीचे व्यवस्थापन मलासार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक जमातींद्वारे केले जाते. शतकानुशतके मलासार जमाती हत्तींसोबत राहत आहेत. मलासार जमातीचे लोक जंगली हत्ती पकडणे आणि त्यांना हाताळण्यात निपुण आहेत. कुमकी हे प्रशिक्षित नर टस्कर्स आहेत जे पकडण्याचे ऑपरेशन करतात. पकडलेल्या या प्राण्यांना अनेकदा कोझिकामुथी हत्ती कॅम्पमध्ये परत आणले जाते आणि त्यांना प्रशिक्षित केले जाते.
हत्ती पकड मोहिमेत सहभाग
कोझिकामुथी हत्ती कॅम्पमध्ये 26 हत्ती आहेत. तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि केरळमध्ये गेल्या 20 वर्षांत 25 हून अधिक जंगली हत्ती पकडण्यात येथील ‘कुमकी’ हत्तींनी मदत केली आहे. कर्नाटकलगतच्या दोडामार्ग भागातही जंगली हत्तींचा उपद्रव जाणवतो. त्यामुळे तेथे सतत हत्ती आणि मानवात संघर्ष होताना दिसतो. सिंधुदुर्गातील माणगाव खोऱ्यातील आंबेरी येथे 2015 मध्ये कर्नाटकातील प्रशिक्षित कुमकी हत्तींकरवी जंगली हत्तींना पकडण्याची माहीम राबविण्यात आली होती.
संयुक्त निर्मितीचे उत्तुंग यश
‘द एलिफंट व्हिस्परर्स’ हा एक भारतीय-अमेरिकन लघुपट आहे. हा लघुपट मूळ तामिळी भाषेत असला तरी नंतर इंग्रजी आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये डब करून गेल्यावषी 8 डिसेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्म ‘नेटफ्लिक्स’वर रिलीज झाला. या चित्रपटाची निर्मिती चार निर्मात्यांनी केली आहे. डग्लस ब्लश, कार्तिकी गोन्साल्विस, गुनीत मोंगा आणि अचिन जैन यांनी संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे. याचे छायांकन (सिनेमैटोग्राफी) करण थापलियाल, क्रिश मखिजा, आनंद बन्सल आणि कार्तिकी गोन्साल्विस यांनी केले आहे.
जंगली कळपासारखे ते कुटुंब…
बोम्मन आणि बेल्ली यांनी केवळ हत्तीच्या बाळाची काळजी घेणे इतकेच केले नाही. भावनिक काळजी आणि प्रेम, आपुलकी आणि रघुशी निर्माण झालेले कौटुंबिक नाते एवढेच हे मर्यादित नाही. माझ्या निरीक्षणानुसार ते जंगली कळपासारखे होते. रघुला असे वाटले की तो आईसोबत आहे. त्याचे वडील आहेत. यामुळे त्याच्यात कौटुंबिक भावना निर्माण झाली, जी त्यांच्यात उपजत असते. कारण हत्ती हे खूप भावनिक, संवेदनशील प्राणी असतात.
-कार्तिकी गोन्साल्विस, दिग्दर्शिका