खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी : वाहतूक कोंडीमुळे अनेकांची धांदल
प्रतिनिधी /पणजी
राज्यात उद्या बुधवार दि. 31 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत असल्याने उत्सवाच्या तयारीसाठी भक्तांच्या उत्साहात वाढ झाल्याने तसेच साहित्य खरेदीसाठी चार चाकी वाहनांचा वापर झाल्याने पणजीसह राज्यातील जवळपास सर्वच बाजारपेठा व महत्त्वाच्या ठिकाणी वाहतुकीची अक्षरशः कोंडी झाली आहे.
राजधानी पणजी शहरात दिवसभर वाहतुकीची कोंडी पहायला मिळाली. पणजी बाजार परिसरात तर दुचाकीही चालविणे कठीण होऊन बसले होते. अनेक ठिकाणी वाहनांच्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय झाली. राज्यात गणेश चतुर्थी उत्सव उद्यापासून सुरू होत आहे व राज्य सरकारने मर्यादित सुटी जाहीर केली असल्याने चतुर्थीच्या तयारीसाठी संपूर्ण कुटुंबीयच खरेदीला निघालेले दृष्टीस पडते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात चारचाकी वाहने रस्त्यावर आलेली आहेत. त्यातून पणजीतील अनेक रस्ते वाहनांनी खचाखच भरलेले आहेत. पणजी पोलिसांनी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात केले खरे, परंतु वाहतुकीची कोंडी सोडविताना त्यांचेही नाकीनऊ झाले.
आजपासून शाळा, महाविद्यालयांना सुटी
गणेश चतुर्थीनिमित्त आजपासून राज्यातील सर्व विद्यालये व महाविद्यालयांना राज्य सरकारने सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे तर सरकारी कर्मचाऱयांना बुधवारी व गुरुवारी सुटी जाहीर केली आहे. राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत.