Tarun Bharat

‘फुटबॉल’चे महाकाव्य

‘फुटबॉलचे सम्राट’ म्हणून ओळखल्या जाणाऱया ब्राझीलचे महान खेळाडू पेले यांच्या निधनामुळे फुटबॉलमधील दमदार अन् नजाकतदार अशा ‘पेले पर्वा’चीच अखेर झाली आहे. तंदुरुस्ती, दमसास, क्षमता, कौशल्य अशा सगळय़ाच पातळय़ांवर कस लावणारा अतिशय गतिमान खेळ ही फुटबॉलची ओळख. या खेळाची व्याख्या बदलतानाच त्याला वेगळय़ा उंचीवर नेण्याचे काम पेले यांनी केले. फुटबॉल म्हणजे पेले आणि पेले म्हणजे फुटबॉल, असे अद्वैत निर्माण होणे, यातूनच त्यांचे श्रेष्ठत्व ध्यानी यावे. त्यांचे मूळ नाव एडसन अरांतेस डो नॅसिमेंटो. परंतु, पेले या दोन अक्षरांनीच संपूर्ण जग व्यापले. त्यांच्या फुटबॉल कारकीर्दीतून त्यांचा झपाटा आणि फुटबॉलवरील असीम निष्ठा याचेच दर्शन घडते. साओ पावलोतील छोटय़ा लीग स्पर्धेत खेळणाऱया पेले यांना नामवंत क्लबचे दरवाजे प्रारंभी बंद होते. 1956 मध्ये सँटोस क्लबमध्ये चंचुप्रवेश केल्यानंतर पेले यांचे नाव खऱया अर्थाने फुटबॉलच्या नकाशावर चमकू लागले. 1957 मध्ये म्हणजेच वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा हा खेळाडू फुटबॉलचा अविभाज्य भाग वा अनभिषिक्त सम्राट कसा बनला, हा सारा प्रवास निश्चितपणे अद्भूत ठरतो. 1958 चा फुटबॉल वर्ल्ड कप हा पेले यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंटच म्हटला पाहिजे. येथूनच त्यांच्या करियरला नवे पंख मिळाले, असे म्हणता येईल. फ्रान्सविरूद्धचा उपांत्य सामना आणि त्यातील त्यांची कामगिरी याची आजही पारायणे होतात. या सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवित त्यांनी संघाला अंतिम फेरीत पोहोचविले. त्यानंतर अंतिम सामन्यात स्वीडनविरूद्ध केलेले दोन अफलातून गोल अन् विश्वचषकावर पेलेंच्या ब्राझीलचे झळकलेले नाव, हे सारे ऐतिहासिकच होय. या विश्वकरंडकात सर्वांत कमी वयाचा फुटबॉलपटू ठरण्याचा मान त्यांना मिळाला असला, तरी त्या पलीकडे जाऊन सातत्य काय असते, हे त्यांनी दाखवून दिले. 1962 च्या वर्ल्ड कपमध्ये दुखापतीमुळे त्यांना केवळ दोनच सामने खेळता आले असले, तरी ब्राझीलने पुन्हा एकदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. अर्थात त्यातही त्यांनी आपले योगदान दिले. 1966 मध्ये मात्र पेले व संघातील अनेक प्रमुख खेळाडू जायबंदी असल्याने पहिल्या फेरीत त्यांच्या संघाला पराभव पत्करावा लागला. त्या वेळी खरे तर ते निवृत्ती घेण्याच्या मनःस्थितीत होते. परंतु, त्यांचे मन वळविण्यात यश आले आणि आपण संपलो नसल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखविले. 1970 च्या वर्ल्ड कपमधील त्यांची कामगिरीही त्यांच्या लौकिकास साजेशी अशीच. सहा सामन्यांमधील चार गोल, वेगवेगळय़ा पातळय़ांवर नोंदविलेली महत्त्वपूर्ण भूमिका, यामुळेच खरे तर तिसऱयांदा ते ब्राझीलच्या विजयाचे साक्षीदार ठरले. मुख्य म्हणजे चारही विश्वचषक स्पर्धांमध्ये त्यांना एकही यलो वा रेड कार्ड मिळाले नाही. त्यांच्या खेळाची सफाई यातून लक्षात यावी. पेले यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 1363 सामन्यात तब्बल 1281 गोल केले. तर ब्राझीलसाठी 92 सामन्यांत 77 गोल टपकवले. यातून पेलेंच्या सुसाट खेळाची कल्पना करता येईल. विविध क्लबकडून खेळणाऱया पेलेंनी सँतोस क्लबकडून खेळताना केलेली कामगिरी अविस्मरणीय होय. 660 सामने आणि 643 गोल, हे सारे अचंबित करणारेच म्हणावे लागेल. एकाच वर्षांत 127 गोल, जागतिक फुटबॉलमधील सर्वाधिक हॅटट्रिकची (92) कामगिरी, 19 नोव्हेंबर 1969 या दिवशी कारकिर्दीतील एक हजाराव्या गोलची केलेली नोंद, असे त्यांच्या आयुष्यातील कितीतरी मैलाचे दगड सांगता येतील. तरीदेखील केवळ संख्यात्मकतेवर त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन कसे करणार? त्यांच्या खेळास लाभलेल्या अभिजात सौंदर्याचे मोल त्याहूनही अधिक, हे त्यांचे चाहतेच सांगू शकतात. मुळात पेलेंचा खेळ नजाकतीने भरलेला असे. त्यातील पदलालित्यास तोड नव्हती. ते मैदानात उतरत तेव्हा तो वेग, आवेग, चापल्य पाहून फुटबॉलशौकिन स्तिमित होत असत. डोळय़ाचे पाते लवते न लवते तोच, पेले अशा पद्धतीने गोल करीत, की ती सारी किमया भासे. चेंडू पायात खेळवून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलकक्षात धडकून गोल करणे, ही तर त्यांची खासियतच होती. चौफेर नजर व इतर खेळाडूंच्या चालींचा अंदाज घेण्याचे असामान्य कौशल्य अन् चेंडूवर नियंत्रण ठेवत अचूक किक मारण्याची क्षमता, हे त्यांच्या खेळाचे विशेष होत. ‘बायसिकल किक’ हा तर त्यांची ओळखच म्हणता येईल. मुळात पेले यांनी फुटबॉलमध्ये धसमुसळेपणा किंवा आडदांडपणा केल्याचे स्मरत नाही. त्यांच्या खेळात एक प्रकारची कलात्मकता होती. काव्य होते. संगीत होते. किंबहुना त्यात एकसुरीपणा नव्हता. उपजत वा निसर्गदत्त शैलीचे असे वरदान लाभलेल्या त्यांच्यासारख्या प्रतिभावान खेळाडूमुळेच फुटबॉलची लोकप्रियता खऱया अर्थाने वाढली, असे म्हटल्यास ते अतिशयोक्त ठरू नये. युरोपातून खेळण्याचे अनेक प्रस्ताव आले असले, तरी त्यांनी ते नाकारल्याचेच दिसतात. अगदी त्यांच्यामुळे काही काळाकरिता युद्धविराम मिळाल्याच्याही आख्यायिका आहेत. 1961 मध्ये ब्राझीलच्या तत्कालीन राष्ट्रपतींनी तर पेले यांना ‘राष्ट्रीय संपत्ती’ म्हणूनही जाहीर केले होते. अर्थात त्यांच्यासारख्या क्रीडापटूस ‘जागतिक संपत्ती’, असे म्हणणे अधिक सयुक्तिक होईल. पेले यांनी ब्राझीलचे क्रीडामंत्री म्हणून काम करताना खेळातील पारदर्शकतेवर भर दिला. त्यांनी केलेला कायदा ‘पेले लॉ’ म्हणून ओळखला जाणे, यातच सारे काही आले. काळ कितीही पुढे सरकला, तरी कोणत्याही संस्कृतीत महाकाव्ये ही अजरामर असतात. फुटबॉलच्या संस्कृतीत पेले नावाचे महाकाव्य असेच उद्याच्या पिढय़ांनाही प्रेरणा देत राहील.

Related Stories

मरणात खरोखर

Patil_p

सावधानता आवश्यक

Amit Kulkarni

जातीयवादाची नखे

Patil_p

नाराजीनाटय़ाची कथा-मागील पानावरून पुढे

Amit Kulkarni

राजकीय मोहिमा

Patil_p

कुटुंबियांच्या आसक्तीत अडकलेला मनुष्य आत्मोद्धारापासून दूर राहतो

Patil_p