Tarun Bharat

अवतरले ‘5-जी’चे युग

Advertisements

पंतप्रधानांच्या हस्ते सेवेला प्रारंभ ः स्मार्टफोन-इंटरनेट शौकिनांमध्ये उत्साह

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशात 5-जी मोबाईल सेवा 1 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय मोबाईल काँग्रेसमध्ये 5-जी सेवा सुरू केली. 5-जी च्या आगमनामुळे इंटरनेटचा वेग 4-जीच्या तुलनेत सुमारे 10 पट वाढणार आहे. 5-जी सेवांची सुरुवात भारतातील नंबर 2 ऑपरेटर भारती एअरटेलने दिल्ली, मुंबई, वाराणसी आणि बेंगळूरसह आठ शहरांमध्ये सेवा सुरू करून केली. या सेवेमुळे देशातील इंटरनेट विश्वाचे दसऱयापूर्वीच ‘सीमोल्लंघन’ झाले आहे.

दूरसंचार उद्योगातील सर्वात मोठा कार्यक्रम असलेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसचे सहावे सत्र शनिवारपासून दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू झाले. चार दिवस चालणाऱया कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी 5-जी सेवेचा थाटात शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आजचा दिवस जगातील पाचव्या सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थेसाठी एक विशेष आणि बहुमूल्य दिवस असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. एअरटेलने ही सेवा सुरू करण्यात आघाडी घेतली आहे. तसेच आता  ‘रिलायन्स जिओ’ कंपनी या महिन्यातच चार महानगरांमध्ये आपली सेवा सुरू करणार आहे. मात्र, तिसऱया क्रमांकावरील वोडाफोन-आयडियाने अद्याप ही सेवा सुरू करण्यासाठी कोणतीही निश्चित टाईमलाईन सूचित केलेली नाही.

4-जी पेक्षा अनेक पटीने वेगवान आणि लॅग-फ्री कनेक्टिव्हिटीसह, 5-जी रीअल टाइममध्ये डेटा शेअर करण्यासाठी अब्जावधी कनेक्टेड डिव्हाइसेस सक्षम करू शकते. आरोग्यसेवा आणि शिक्षणापासून कृषी आणि आपत्ती निरीक्षणापर्यंतच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची क्षमता यामध्ये आहे. पुढील काही वर्षांत 5-जी सेवा हळूहळू संपूर्ण देशभर व्यापली जाईल. जिओने डिसेंबर 2023 पर्यंत आणि भारती एअरटेलने मार्च 2024 पर्यंत संपूर्ण देशात सेवा प्रदान करण्याची घोषणा केली आहे. सेवेच्या लॉन्चिंगप्रसंगी तीनही प्रमुख दूरसंचार ऑपरेटर्सनी भारतातील 5-जी तंत्रज्ञानाची क्षमता दर्शविण्यासाठी त्याच्या वापराचे प्रदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशामधील तीन वेगवेगळय़ा ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना 5-जी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोडण्यात आले होते.

देशातील 130 कोटी भारतीयांना 5-जी च्या रूपाने दूरसंचार विभागाकडून एक अद्भूत भेट मिळत आहे. 5-जी ही नवीन युगाची पहाट आहे. ही संधींच्या अनंत अपेक्षांची सुरुवात असल्याचे उद्गार पंतप्रधानांनी या सेवेच्या अनावरणप्रसंगी काढले. काही देश 2-जी, 3-जी आणि 4-जी दूरसंचार सेवांच्या तंत्रज्ञानासाठी परदेशी देशांवर अवलंबून असताना भारताने 5-जी मध्ये प्रमुख भूमिका बजावत स्वदेशी तंत्रज्ञानाने इतिहास रचला आहे, असे मोदी म्हणाले. देशात 2014 मध्ये केवळ 6 कोटी इतके असलेले इंटरनेट वापरकर्ते आता 80 कोटी झाले आहेत, तर आठ वर्षांपूर्वी 100 पेक्षा कमी पंचायतींच्या तुलनेत ऑप्टिकल फायबर आता 1.7 लाख ग्रामपंचायतींना जोडते, असेही ते म्हणाले.

‘डिजिटल इंडिया’ची झलक

डिजिटल इंडियाबद्दल बोलताना काही लोकांना वाटते की ही फक्त एक सरकारी योजना आहे. पण डिजिटल इंडिया हे फक्त एक नाव नाही, तर देशाच्या विकासाचे ते एक मोठे व्हिजन आहे. या व्हिजनचे उद्दिष्ट ते तंत्रज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे हे आहे. हे मिशन लोकांकडूनच लोकांसाठी चालवले जात असल्याचे त्यांनी प्रकर्षाने नमूद केले. तसेच डिजिटल पेमेंटही दिवसेंदिवस वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आता सर्वांसाठी इंटरनेटच्या ध्येयावर त्याच पद्धतीने काम करत आहोत, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी चालवली गाडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्लीत बसून युरोपमधील कारची रिमोट चाचणी केली. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. पंतप्रधान मोदी समोरच्या स्टेअरिंगने कार कंट्रोल करत आहेत. कारच्या चाकांची हालचाल समोरच्या स्क्रीनवर दिसत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे

1 ऑक्टोबरची नोंद सुवर्णाक्षरात होईल!

5-जी सेवेचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी त्याचे फायदे आणि ही सेवा भारतात कशाप्रकारे क्रांती घडवून आणेल, यावर भाष्य केले. तसेच आजच्या तारखेची नोंद इतिहासात सुवर्ण अक्षरात होईल, असेही ते म्हणाले. आम्ही सत्तेत आल्यानंतर देशात तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला. आम्ही डिजिटल भारत ही संकल्पना सुरू केली. त्याचा परिणाम आज भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहे. डिजिटल वापरावर भर देण्याबरोबच आपण उपकरणांच्या किंमती आणि डेटाच्या किंमतीवरही लक्ष केंद्रीत केल्याचे त्यांनी सांगितले.

अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार

तज्ञांच्या मते, 5-जी तंत्रज्ञानाचा भारताला खूप फायदा होईल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठय़ा प्रमाणात फायदा होण्याची शक्मयता आहे. आगामी काळात 5-जी नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडण्याची शक्मयता आहे. केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर 5-जी नेटवर्कचा शुभारंभ हे एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. भारतातील टेलिकॉम क्षेत्राचा ग्लोबल बेंचमार्कसोबत ताळमेळ बसवण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

एअरटेलकडून लाँचिंग, जिओची सेवा दिवाळीत

एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी 8 शहरांमध्ये 5-जी सेवा लाँच करण्याची घोषणा केली. यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, वाराणसी, बेंगळूर, हैदराबाद आणि सिलीगुडी यांचा समावेश आहे. एअरटेलने मार्च 2024 पर्यंत देशभरात 5-जी सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. एअरटेलपाठोपाठ आता रिलायन्स- जिओ दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई या शहरांमध्ये दिवाळीपर्यंत ही सेवा सुरू करेल. त्याचवेळी जिओच्या माध्यमातून डिसेंबर 2023 पर्यंत 5-जी सेवा देशाच्या कानाकोपऱयात पोहोचेल, असे मुकेश अंबानी यांनी शनिवारी इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये सांगितले.

5-जी सेवेचे फायदे!

वापरकर्ते जलद गतीचे इंटरनेट वापरू शकणार

व्हिडीओ गेमिंगच्या क्षेत्रात मोठा बदल होणार

मनोरंजन, दळणवळण क्षेत्रात खूप बदल अपेक्षित

व्हिडीओ न अडखळता पाहण्यासाठी उपलब्ध

इंटरनेट कॉलिंगमध्ये आवाज स्पष्टपणे ऐकू येईल

2 जीबीचा चित्रपट 10-20 सेकंदात डाउनलोड

कृषी-शेतांच्या देखरेखीसाठी ड्रोनचा वापर शक्मय

मेट्रो आणि चालकविरहित वाहने चालवणे सुकर

कारखान्यांमध्ये रोबोट्सचा वापर करणे सोयीस्कर

कार्यालयीन व ऑनलाईन कामांना गती येणार

‘5-जी’ म्हणजे नेमके काय?

इंटरनेट नेटवर्कच्या पाचव्या पिढीला ‘5-जी’ असे म्हणतात. ही एक वायरलेस ब्रॉडबँड इंटरनेट सेवा असून ती लहरींद्वारे हाय-स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करते. त्यात प्रामुख्याने तीन प्रकारचे फ्रिक्वेन्सी बँड आहेत. यामध्ये कमी वारंवारता बँड, मध्य फ्रिक्वेन्सी बँड आणि उच्च फ्रिक्वेन्सी बँड असे तीन वारंवारता टप्पे आहेत.

Related Stories

”पंतप्रधान मोदींचे मौन हे द्वेषपूर्ण आवाजांना बळ देणारे”

Abhijeet Khandekar

काश्मिर फाईल्सचे सत्य लोकांच्या गळ्यात काट्या सारखा रुतला- अनुपम खेर

Abhijeet Khandekar

प्रियंका गांधी ललितपूर दौऱ्यावर; मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Archana Banage

हरियाणामध्ये 31 मे पर्यंत वाढविले लॉकडाऊन!

Tousif Mujawar

अर्णव प्रकरणात उच्च न्यायालयावर ताशेरे

Patil_p

केंद्र सरकारकडून वाहनधारकांना दिलासा

Patil_p
error: Content is protected !!