अलीना काबेवा विरोधात लादले जाणार निर्बंध
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची कथित प्रेयसी अलीना काबेवा विरोधात युरोपीय महासंघ कारवाई करणार आहे. युरोपीय महासंघ रशियाच्या दुष्प्रचारात तिची भूमिका आणि पुतीन यांच्यासोबतचे घनिष्ठ संबंध पाहता या निर्बंधांना मंजुरी देऊ शकतो. युक्रेन-रशिया युद्धात रशियाच्या विरोधात लादण्यात आलेल्या निर्बंधांच्या सहाव्या यादीत काबेवाचे नाव प्रस्तावित आहे.
युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांनी रशियन कच्चे तेलाच्या आयातीवर बंदी घालण्याशी संबंधित प्रस्ताव बुधवारी पाठविला होता, हा प्रस्ताव संमत होण्यासाठी 27 देशांचे एकमत होण्याची गरज आहे. हंगेरी, स्लोवाकिया आणि अन्य पूर्व युरोपीय देशांनी या प्रस्तावाला समर्थन देण्यास नकार दिला आहे. पर्याय उपलब्ध होईपर्यंत निर्बंध टाळण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. हा प्रस्ताव संमत झाल्यास काबेवा यांना युरोपीय महासंघाच्या क्षेत्रात पाऊल ठेवता येणार नाही तसेच त्यांची येथील मालमत्ता जप्त केली जाणार आहे.
काबेवा या नॅशनल मीडिया ग्रूपच्या संचालक मंडळाची अध्यक्ष असल्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आली आहे. नॅशनल मीडिया ग्रूप एक होल्डिंग कंपनी असून ती रशियाच्या जवळपास सर्व प्रसारमाध्यमांमध्ये हिस्सेदारी बाळगून आहे. माजी जिमनॅस्ट अलीना ही पुतीन यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असल्याचे मानले जाते.
पुतीन यांच्याशी जवळीक असल्यानेच काबेवा आणि तिच्या कुटुंबाला वैयक्तिक लाभ मिळाले आहेत. काबेवा यांना पुतीन यांच्यामुळे मोठा आर्थिक लाभ झाला आहे. युरोपीय महासंघाच्या प्रस्तावित यादी स्तंभलेखिका रिया नोवोस्ती समवेत अन्य तीन जणांची नावे सामील आहेत. युक्रेन युद्धात रशियाच्या वतीने दुष्प्रचार करत असल्याचा आरोप रियावर आहे.