300 तरंगते हट्स अन् होम स्टे तोडण्याचे मणिपूर सरकारचे आदेश
वृत्तसंस्था / इंफाळ
मणिपूरची राजधानी इंफाळपासून 30 किलोमीटर अंतरावर देशातील सर्वात मोठे लोकटक सरोवर आहे. ईशान्य भारतातील पर्यावरणीय रचनेत गोडय़ा पाण्याच्या या सरोवराचे विशेष स्थान आहे. पर्यटकांची वाढती संख्या आणि यावर सातत्याने तयार होणाऱया होम स्टेमुळे या सरोवराच्या अस्त्वालाच धोका निर्माण झाला आहे. याचमुळे मणिपूर सरकारने पुढील 15 दिवसांमध्ये सरोवरावर तयार करण्यात आलेल्या 300 हून अधिक फ्लोटिंग हट्स (तरंगत्या झोपडय़ा) आणि होम स्टे तोडण्याचा आदेश दिला आहे.
या झोपडय़ा आणि होम स्टे सरोवरच्या फुमदीवर (तरगंता बायोमास) तयार करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक स्वरुपात निर्माण फुमदीवर झोपडय़ा आणि होम स्टे तयार करण्यात आले असून ते तरंगत असतात. या अवैध झोपडय़ा आणि होम स्टेची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. वीकेंडवेळी लोकटक सरोवराच्या ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याचे स्थानिक लोकांचे सांगणे आहे.
सरोवरारच फेकताहेत कचरा
पर्यटकांना नौकांद्वारे या झोपडय़ांपर्यंत पोहोचविले जाते. पावसाळय़ात सरोवराचे क्षेत्रफळ वाढून 500 चौरस किलोमीटर होते. मणिपूरमधील 3 जिल्हे विष्णूपूर, थोवांग आणि कचिंगपर्यंत हे सरोवर फैलावलेले आहे. मासेमारीसह या सरोवरात भाज्यांचे पिक घेतले जाते. जेली, कुम्ब्रेक, कमळांसह अनेक गोष्टी या सरोवरात मिळतात. हे सरोवर लोकांचे पोषणकर्ते आहे. ऑक्टोबरमध्ये येथे लोकटक दिन साजरा केला जातो. पर्यटकांमुळे सरोवरातील प्लास्टिक कचरा सातत्याने वाढत आहे. तर हट्स चालविणारेच सरोवरात कचरा फेकत होते अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.
15 दिवसांची मुदत
लोकटक विकास प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एल. भगतोन सिंह यांनी राज्य सरकार सरोवराच्या अस्तित्वासाठी गंभीर असल्याचे सांगितले. 15 दिवसांमध्ये लोकांनी स्वतःहून या झोपडय़ा तसेच होम स्टे न हटविल्यास सरकार त्या तोडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.