Tarun Bharat

‘साबांखा’च्या कंत्राटदाराचा प्रयोग फसला

Advertisements

पणजीतील रस्त्यावरील बारीक खडी गेली वाहून, काळय़ाकुट्ट भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

प्रतिनिधी /पणजी

केवळ सरकारच्या नव्हे तर जनतेच्या डोळय़ाला पाणी लावण्याचा सा. बां. खात्याच्या कंत्राटदारांनी केलेला प्रयोग सपशेल फसला आणि पणजीतील कोटय़वधी रुपये खर्च करून दीड दोन महिन्यांपूर्वी केलेल्या हॉटमिक्सिंगचे बिंग फुटले. बहुतांश रस्त्यांवरील बारीक खडी बाजूला सरली आहे. त्यातून छोटय़ा टेकडय़ा तयार झाल्या. हे रस्ते अपघातास कारणीभूत ठरले आहेत. या काळय़ाकुट्ट भ्रष्टाचाराची त्वरित चौकशी होणे आवश्यक आहे.

आतापर्यंत भ्रष्टाचाराच्या अनेक गोष्टी आपण ग्रामीण भागातील रस्त्यांवरून ऐकत होतो. आता खुद्द राजधानी पणजीत सरकारच्या नाकावर टिच्चून सा. बां. खात्याच्या कंत्राटदारांनी केलेला भ्रष्टाचार उघडा पडला आहे. एप्रिल, मे मध्ये केलेले हॉटमिक्सिंगचे रस्ते गेल्या 15 दिवसांतील पावसामुळे वाहून गेले. या रस्यांच्या फेर दुरुस्तीवर सा. बां. खात्याने कोटय़वधी रुपये खर्च केले आहेत. कंत्राटदाराने सरकारची विशेषतः सा. बां. खात्याची फसवणूक तर केलेली आहेच, शिवाय जनतेची फसवणूक व जनतेला आता विशेषतः दुचाकी वाहन चालकांना अडचणीत आणले आहे.

डांबरात जळक्या ऑईलचा समावेश ?

पणजीतील अनेक रस्त्यांचे हॉटमिक्सिंग दोन महिन्यांपूर्वी करण्यात आले. हॉटमिक्सिंग करताना त्यासाठी दोन थर वापरून रस्ता मजबूत केला जातो. परंतु कित्येक ठिकाणी केवळ वरच्या थराचाच वापर करून रस्ते काळेकुट्ट आणि गुळगुळीत करून टाकले. परंतु हा प्रकार किती फसवा होतो हे आता पावसाळय़ातील केवळ 15 ते 20 दिवस उलटल्यानंतर स्पष्ट झाले. पणजीतील हॉटमिक्सिंग केलेल्या रस्त्यांवरील खडीने डांबराची साथ सोडली आणि अगोदरच्या रस्त्यांनी आपले डोके वर केले आहे. कोकणी अकादमी समोरील रस्त्यावरील खडी वाहून गेली. हॉटमिक्सिंग मध्ये खरोखरच डांबर टाकले होते का ? हा प्रश्न उद्भवलेला आहे. तसेच मांडवी पुलाखालून बसस्थानकापर्यंत जाणाऱया रस्त्यावरील हॉटमिक्सिंग उखडून त्याच्या छोटय़ा छोटय़ा टेकडय़ा झाल्या आहेत. दुचाकी वाहन चालकांसाठी अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. हॉटमिक्सिंग करताना डांबर कमी व जळकी ऑईलचा त्यात समावेश केला असण्याची शक्यता नागरिकांमध्ये वर्तविली जात आहे.

याशिवाय पाटोवरील डॉ. विली पूल ते जुने सचिवालय परिसरातील नुकत्याच केलेल्या हॉटमिक्सिंगची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे. कंत्राटदाराने हॉटमिक्सिंग करताना त्यातील दोन थर देऊन त्याचा पाया मजबूत करायचा असतो. प्रत्यक्षात मुख्य जाड खडीचा थर दिलाच नाही. केवळ बारीक खडीचा समावेश असलेला वरचा थर देऊन रस्त्याची बोळवण केली. यातही डांबर कमी वापरले गेले. तथापि हे रस्ते जरी कंत्राटदारांनी बांधले तरी रस्त्यांचे निरीक्षण करण्यासाठी असलेल्या सा. बां. खात्याचे अभियंते त्यावेळी गप्प कसे बसले ? की त्यांनी कंत्राटदारांकडे मिली भगत केली ?

कारवाई करण्याची जनतेची मागणी

पणजीतील रस्त्यांवरील हॉटमिक्सिंग अत्यल्प पडलेल्या पावसाने वाहून गेल्याने भ्रष्टाचार उघडकीस आलेला आहे. सा. बां. खाते मंत्री नीलेश काब्राल ! आता कारवाई कराच, अशी मागणी राजधानी पणजीतील नागरिकांनी केलेली आहे. सरकारचे कोटय़वधी रुपये पाण्यात गेलेले आहेत. या प्रकरणी संबंधित जबाबदार की बेजबाबदार अधिकाऱयांवर देखील कारवाई होणे आवश्यक आहे.

Related Stories

गुरांची तस्करी करणारी टोळी फोंडय़ात सक्रीय

Omkar B

दवर्ली स्वामी समर्थ गडावर दोन गटात तणाव

Amit Kulkarni

वास्कोतील श्री दामोदर भजनी सप्ताह यंदाही साध्या पध्दतीने साजरा होणार, फेरी, गर्दी व कार्यक्रमांना यंदाही फाटा

Amit Kulkarni

‘हाव्स बिल्डिंग ऍडव्हान्स’ योजना मागे घेतल्याने मानवी हक्काचा भंग नव्हे

Amit Kulkarni

कुडणेत भाजपतर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन

Amit Kulkarni

दाबोळीचा भरीव विकास झाला, लवकरच अनेक प्रकल्प होणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!