आजरा : बोलेरो गाडीतून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी आपल्यावर हल्ला करत आपल्याजवळील रोख रकमेसह आपला मोबाईल चोरून नेला आहे. इतकेच नाही तर आपणाला बांधून घालून मारहाण करून आपण चालवत असलेला ट्रकही लंपास केला आहे. असे सांगून सहानुभूती मिळवू पाहणाऱ्या अशोक पोपट पवार या लातूर येथील २७ वर्षीय अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी संशयावरून अटक केली. त्याच्याकडे उलट तपासणी करून पोलिसी खाक्या दाखवताच अशोक याने हा दोन साथीदारांच्या मदतीने केलेला बनाव असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणात एक अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला असून, जवळपास ३५ गुन्ह्यात सहभाग असणाऱ्या अशोक याला जेरबंद केल्याबद्दल आजरा व सिंधुदुर्गनगरी पोलिसांचे कौतुक होत आहे.
या प्रकरणातील अशोक याच्या आणखी दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आजरा-आंबोली मार्गावर तुलसी धाब्याच्या पुढील बाजूस रस्त्याशेजारी गुरुवारी सकाळी हात पाय बांधलेल्या स्थितीत अशोक काही स्थानिक ग्रामस्थांना दिसून आला. यावेळी त्याने बोलेरो गाडीतून आलेल्या सहा जणांनी सिंधुदुर्ग येथील हुमरमळा या ठिकाणी आपली मालवाहतूक करणारी गाडी अडवून आपल्याला मारहाण करून पंधरा हजार रुपये व मोबाईल काढून घेतले व त्याचबरोबर आपला ट्रकही घेऊन ते पसार झाल्याचे आरोपीने प्राथमिक स्तरावर माहिती सांगितली होती. मात्र पोलिसांनी दोन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला आहे.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी राणेंना संपवण्याची सुपारी दिली होती, नितेश राणेंचा खळबळजनक आरोप