शेतकरीवर्गातून मागणी : शेतशिवारातील रस्त्यांतून जाताना मोठय़ा प्रमाणात खाचखळग्यांचा त्रास
वार्ताहर /काकती
येथील शेतशिवार विकासाच्या कामाकडे गेली दोन वर्षे दुर्लक्ष झाले असून शेतकरी मंडळाने मरगळ झटकून शेतीच्या सर्वांगिण विकासकामाला लागावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
येथील शिवारातील कळ्ळीमार्ग रस्ता, तालीम ते भरम तलावपर्यंतचा रस्ता, सर्व रस्त्यांना जोडणारा आडवा रस्ता, मधला रस्ता या सर्व रस्त्यांतून मोठय़ा प्रमाणात खाचखळगे पडले आहेत. या खाचखळग्यांतून अधिक पावसाच्या पाण्याचा निचरा न होता पाणी साठून राहत आहे. या कारणामुळे पायी चालत जाणाऱया व सायकली घेऊन मार्गक्रमण करणाऱयांना त्रासाचे झाले आहे.
रस्ता विकासकामाकरिता ग्राम पंचायतीच्यावतीने रोजगार हमी योजनेतून कामे करून घेण्यास पुरेशी मुभा असून शेतकरी मंडळाने काकती ग्राम पंचायतीशी संपर्क साधल्यास कामाचा आराखडा तयार करून निधी उपलब्ध करून रस्ते बांधण्यास वेळ होणार नाही. गावातील मजूरवर्गाच्या हाताला कामही मिळेल. पावसाळय़ात शिवारातील भरम तलावाचे गेट व्हॉल्व सुस्थितीत नसल्याने भरम तलाव शिवारात पाणी थांबून भातपिकांचे नुकसान होत आहे. गेट व्हॉल्व बांधणे आवश्यक आहे.
हद्द मोजणीला न्याय कधी?
शेतकरी आपल्याच शेजारील शेतकऱयांचा हद्दीचा बांध कोरून (काढून) शेजारधर्म बिघडवत आहेत. तालुका भू-मापन कचेरीकडून मोजणी करून घेत आहेत. मात्र, मोजणी करूनही अतिक्रमण केलेली जागा मिळत नाही. यासंदर्भात शेतकरी मंडळाने तोडगा काढून न्यायाचा, निवाडा देणे आवश्यक आहे. पावसाळय़ात खेड पाणी (अतिरिक्त नको असलेले) शेतपट्टीच्या खाली सोडणे असून त्याऐवजी आडवे पाणी सोडून, ठरावीक शेतकऱयांचे नुकसान करीत आहेत. शिवारातील रितीरिवाजाची पायमल्ली करणाऱयांना न्यायदानाचा धाक नसल्याने रिवाजाचे उल्लंघन होत आहे. अशा साऱया बाबींना न्याय मिळवून देणे हे शेतकरी मंडळाचे कर्तव्य आहे.
शेतकरी मंडळाचे माजी अध्यक्ष दिवंगत मनोहर मुंगारी जातीने लक्ष देत होते. शेतकऱयांच्या सोयीसाठी सलोख्याने पोटरस्ते करण्यासाठी मार्गदर्शन करीत होते. शिवारातील रस्त्यांचा विकास म्हणजे गावचा विकास हे त्यांचे म्हणणे होते. शिवारातील विकासकामांकरिता शेतकरी मंडळाची स्थापना झाली. परिणामी शिवारातील रस्त्यांची कामे झाली. त्यामुळे आज पावसाळय़ातही मालवाहू टेम्पोतून भाजीपाला बाजारात घेऊन जाण्याची सोय झाली. शेतकरी मंडळाने मरगळ झटकून शेतीच्या विकासकामांकडे लक्ष देऊन कामे करावीत, अशी मागणी होत आहे.