Tarun Bharat

उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हाती

Advertisements

निवडणूक यंत्रणा सज्ज, कडेकोट बंदोबस्त : आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रारंभ,5038 उमेदवार, 8.27 लाख मतदार

प्रतिनिधी /पणजी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अधिकृत प्रचाराची सोमवारी सांगता झाल्यानंतर काल निवडणुकीच्या पूर्वसंध्येला प्रत्येक उमेदवाराने मतदारांची अखेरची मनधरणी केली व आपल्या नशिबाचा फैसला मतदार आणि दैवाच्या हवाली केला. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगानेही निवडणूक प्रक्रियेच्या तयारीवर शेवटचा हात फिरवत राज्यातील सर्व मतदान पेंद्रे मतदानासाठी सज्ज केली. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रारंभ होणार आहे.

आज बुधवारी 10 ऑगस्ट रोजी राज्यातील 186 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून 1,464 प्रभाग आहेत. त्यापैकी उत्तर गोव्यातील 97 पंचायतींमधून 2,667 आणि दक्षिणेतील 89 पंचायतींमधून 2,371 मिळून एकुण 5,038 उमेदवारांसाठी 8 लाखांपेक्षा जास्त मतदार मतदान करणार आहेत. त्यात दोन तृतीयपंथी मतदारांचाही समावेश असेल. विविध ग्रामपंचायतीमधून यापूर्वीच 64 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी 21 जागा, अनुसूचित जमातीसाठी 187 आणि ओबीसींसाठी 307 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

एकूण 10, 700 कर्मचारी तैनात

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेशा पोलीस फौजफाटय़ासह सुमारे 10,700 मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मंगळवारी कडेकोट बंदोबस्तात मतदान साहित्यासह पथके बूथवर रवाना झाली.

जमावबंदीचे 144 कलम लागू

राज्यात सध्या जमावबंदीचे 144 कलम लागू करण्यात आले असून पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव बेकायदेशीर मानला जाईल. मतदान प्रक्रिया संपेपर्यंत हे कलम लागू राहील. आज मध्यरात्रीपर्यंत कोरडा दिवस राहणार आहे. सर्व मद्य दुकाने, बार आणि रेस्टॉरंटना या कालावधीत विक्री न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

45 मतदान केंद्रे संवेदनशील

राज्यातील 45 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यात उत्तरेतील 27 आणि दक्षिण गोव्यातील 18 केंद्रांचा समावेश आहे. त्यामुळे अन्य मतदान केंद्रांच्या तुलनेत या 45 केंद्रांच्या परिसरात आज अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. त्याशिवाय आज दि. 10 रोजी मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरातील सर्व आस्थापने बंद राहणार असून या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील.

राजकीय पाठिराख्यांची प्रतिष्ठा पणाला

राज्यात अनेक ठिकाणी सगेसोयरेच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत, तर अनेक प्रभागांमधून एकाच पक्षाचे कार्यकर्ते रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय पाठिराख्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक आमदार, मंत्री स्वतःच्या मतदारसंघातच ठाण मांडून असल्याचे वृत्त आहे.

पैशांचे वाटप झाल्याच्या तक्रारी

असे एकुण चित्र असताना राज्यातील अनेक भागातून मतदारांना आकृष्ट करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पैशांचा वापर झाल्याचेही वृत्त आहे. काही ठिकाणी रोखड आणि कडधान्य तसेच मौल्यवान वस्तू यांचेही वाटप करण्यात आले असून त्यासंबंधी भरारी पथकांकडे तक्रारीही पोहोचल्याचे वृत्त सायंकाळी हाती आले होते.

Related Stories

उत्पल पर्रिकर विधानसभा पणजीतूनच लढणार

Sumit Tambekar

आत्मनिर्भर भारतमुळे राज्य स्वयंपूर्णतेकडे जाणार

Omkar B

कात्रणांच्या संग्रहाचा नेरुरकर यांचा ध्यास कौतुकास्पद

Omkar B

लोकशाहीच्या मंदिरातच लोकशाहीचा खून

Patil_p

केपेतील नवीन मार्केट इमारतीची नगराध्यक्षांकडून पाहणी

Patil_p

गोवा मुक्तीनंतर साटेली, काझरेद्याट,बंदीरवाडा गावांना मिळणार रस्त्याची सुविधा

Amit Kulkarni
error: Content is protected !!