प्रतिनिधी/ सातारा
कोरोना काळानंतर सातारा पोलीस दलाची शिपाई पदाची भरती प्रक्रिया शासनाच्या निर्देशानुसार राबवण्यात आली. कमी जागा असल्या तरीही पोलीस व्हायचं म्हणून उच्च शिक्षित तरुणांनी या भरती प्रक्रियेत मोठा सहभाग नोंदवला होता. आपला नंबर येईल याकरता पोलीस कवायत मैदानालगत असलेल्या शासकीय इमारतीच्या परिसरात अनेक भरती इच्छूक मुलांनी आपला मुक्काम ठोकला होता. रविवारी शेवटच्या दिवशी अंतिम लॉटची चाचणी घेतली गेली. लवकरच मैदानी चाचणीचे गुण जाहीर करण्यात येतील, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी सांगितले.
सातारा पोलीस दलामध्ये शिपाई या पदासाठी सुमारे 145 जागा होत्या. त्याकरता सुमारे साडे सात हजार इच्छूकांचे अर्ज होते. अर्ज आलेले असताना सातारा पोलीस दलाच्यावतीने पोलीस कवायत मैदान येथे दि. 4 पासून भरती प्रक्रियेला सुरुवात केली. पोलीस अधीक्षम समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर हे स्वतः या भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. भरती प्रक्रियेच्या ठिकाणी सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक भगवान निंबाळकर, शाहुपूरीचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके हे ही भरतीवेळी दररोज वेळ देत होते. पोलीस भरतीसाठी सातारा जिह्यातसह राज्यभरातून उच्च शिक्षीत तरुणांनी हजेरी लावली होती. वय वाढवल्याने अनेकांनी आर्वजून शेवटचाच ट्राय म्हणत हजेरी लावली होती.
दररोज एक हजार उमेदवारांची शारिरीक तपासणी केली जात होती. अनेक तरुण आपला नंबर येईल या आशेने मैदानाजवळच थांबून राहत होते. थंडी वाऱयात मिळेल त्या नाष्टय़ावर दिवस काढत मैदानी चाचणी करताना अनेक युवक दिसत होते. शेवटच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही प्रक्रिया पार पडली. आता इच्छूकांच्या नजरा मैदानी चाचणीच्या निकालाकडे लागून राहिल्या आहेत.
लवकरच मैदानी चाचणीचे गुण जाहीर करु
सातारा पोलीस दलाच्या शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेची मैदानी चाचणीचे गुण लवकर सातारा पोलीस दलाच्या बेवसाईटवर जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच वरीष्ठस्तरावरुन ज्या पुढील मार्गदर्शक सुचना येतील त्यानुसार परीक्षाही जाहीर करण्यात येईल.
बापू बांगर अप्पर पोलीस अधीक्षक