वृत्तसंस्था/ कोईमतूर
दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण विभाग आणि पश्चिम विभाग यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात दक्षिण विभागाने उत्तर विभागाचा विक्रमी 645 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. तर दुसऱया सामन्यात पश्चिम विभागाने मध्य विभागाचा 279 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. दक्षिण विभागाच्या आर.साई किशोरने सामन्यात 10 बळी मिळविले.
दक्षिण आणि उत्तर विभाग यांच्यातील सामन्यात दक्षिण विभागाने आपला पहिला डाव 8 बाद 630 धावांवर घोषित केला. त्यानंतर उत्तर विभागाचा पहिला डाव 207 धावात आटोपला. दक्षिण विभागाने आपला दुसरा डाव 4 बाद 316 धावांवर घोषित करून उत्तर विभागाला निर्णायक विजयासाठी 740 धावांचे कठीण आव्हान दिले. पण दक्षिण विभागाच्या अचूक गोलंदाजीसमोर उत्तर विभागाचा दुसरा डाव 30.4 षटकात केवळ 94 धावात आटोपला. उत्तर विभागातर्फे यश धुलने एकाकी लढत देत 59 धावा जमविल्या. दक्षिण विभाग संघातील आर. साई किशोर आणि के. गौतम तसेच टी. त्यागराजन यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. साई किशोरने पहिल्या डावात 70 धावांत 7 बळी मिळविले होते.
मुलानीचे 5 बळी
या स्पर्धेतील दुसऱया सामन्यात पश्चिम विभागाने पहिल्या डावात 257 धावा जमविल्या. त्यानंतर मध्य विभागाचा पहिला डाव 128 धावात आटोपला. पश्चिम विभागाने दुसऱया डावात 371 धावा जमवित मध्य विभागाला निर्णायक विजयासाठी 501 धावांचे आव्हान दिले. पण मध्य विभागाचा दुसरा डाव 57.1 षटकात 221 धावात आटोपला. पश्चिम विभाग संघातील गोलंदाज मुलानीने 72 धावात 5 गडी बाद केले. मध्यविभागातर्फे रिंकू सिंगने 65 धावा जमविल्या. आता दक्षिण विभाग आणि पश्चिम विभाग यांच्यातील पाच दिवसांचा अंतिम सामना कोईमतूर येथे 21 सप्टेंबरपासून खेळविला जाईल.
संक्षिप्त धावफलक ः दक्षिण विभाग प. डाव 8 बाद 630 डाव घोषित, उत्तर विभाग सर्वबाद 207, दक्षिण विभाग दु. डाव 4 बाद 316 डाव घोषित, उत्तर विभाग दु. डाव 30.4 षटकात सर्वबाद 94 (धुल 59, साई किशोर, गौतम, त्यागराजन प्रत्येकी तीन बळी).
पश्चिम विभाग प. डाव 257, मध्य विभाग प डाव 128, पश्चिम विभाग दु. डाव सर्वबाद 371, मध्य विभाग दु. डाव 57.1 षटकात सर्व बाद 221 (रिंकू सिंग 65, एस. मुलानी 5-72).