भारतीय महिलांचे पारडे जड, जेतेपद पटकावण्याचे भारताचे प्रयत्न
वृत्तसंस्था/ ईस्ट लंडन
महिलांच्या तिरंगी मालिकेतील अंतिम सामना भारत व यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यात आज गुरुवारी येथे होत असून काही दिवसांवर आलेल्या महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा लक्षात घेऊन तयारीचा हा अंतिम टप्पा भारतीय संघ जेतेपद पटकावत संपवण्याचा प्रयत्न करेल. सायंकाळी 6.30 पासून या सामन्याला सुरुवात होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून त्याचे प्रक्षेपण होईल.
मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारतीय महिलांना 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला होता. पण येथील तिरंगी मालिकेत भारताने जोरदार मुसंडी मारत तीन सामने जिंकले असून जेतेपदाने त्याची सांगता करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. असे झाल्यास 10 फेबुवारीपासून सुरू होणाऱया विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आत्मविश्वासाने उतरू शकेल. भारताने तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळविला तर परतीचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यानंतर विंडीजला दोन्ही सामन्यात भारताने हरवित अंतिम फेरी गाठली. असे असले तरी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांना ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यासारख्या बलाढय़ संघांविरुद्ध त्यांच्यापेक्षा सरस कामगिरी करावी लागणार आहे.
अष्टपैलू दीप्ती शर्माने तीन सामन्यात 8 बळी मिळविले असल्याने अंतिम लढतीत भारतासाठी तीच प्रमुख गोलंदाज असेल. जिच्याबद्दल बरेच बोलले जाते, पण प्रत्यक्ष मैदानावर अपेक्षापूर्ती होत नाही, अशा जेमिमा रॉड्रिग्जला विंडीजविरुद्ध शेवटच्या साखळी सामन्यात बऱयापैकी फलंदाजीचा सराव करता आला. तिला कामगिरीत सातत्य राखावे लागेल. पूजा वस्त्रकारच्या आगमनामुळे भारताची बाजू आणखी भक्कम झाली असून दुखापतीमुळे तिला याआधीच्या सामन्यांत खेळता आले नव्हते. भारताच्या यू-19 महिला संघाने पोश्चेफस्ट्रूम येथे झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले असल्याने हरमनप्रीतच्या वरिष्ठ संघाला ही बाब प्रेरणादायक ठरेल. तिरंगी मालिकेचे जेतेपद पटकावल्यानंतर आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचा भारताला पुरेपूर प्रयत्न करता येईल. वरिष्ठ स्तरावर भारतीय महिलांना आजवर आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही.
संभाव्य संघ ः भारतीय महिला ः हरमनप्रीत सिंग (कर्णधार), स्मृती मानधना, अंजली सरवानी, यास्तिका भाटिया, हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, अमनज्योत कौर, एस. मेघना, मेघना सिंग, शिखा पांडे, स्नेह राणा, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, पूजा वस्त्रकार, सुषमा वर्मा, राधा यादव.
दक्षिण आफ्रिका महिला ः सुने लुस (कर्णधार), क्लो ट्रायॉन, ऍनेक बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लर्क, ऍनेरी डर्कसन, लारा गुडॉल, शबनिम इस्माईल, सिनालो जाफ्ता, मेरिझेन कॅप, आयाबोंगा, खाका, मसाबाता क्लास, तेबोगो माचेक, नॉनकुलुलेको मलाबा, तुमी सेखुखुने, डेल्मी टकर, लॉरा वुलव्हार्ट.
सामन्याची वेळ ः सायंकाळी 6.30 पासून
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डीडी फ्री डिश.