गोवा पायाभूत विकास महामंडळाचा उपक्रम
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील पहिली सरकारी प्राथमिक हरित शाळा सांखळी येथे साकारली असून येत्या 30 मे रोजी तिचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. गोवा पायाभूत विकास महामंडळाने हा उपक्रम हाती घेतलेला असून या शाळेत प्रवेश घेणाऱया शाळकरी मुलांना संस्कारक्षम, मूल्यवर्धित आणि अत्यंत मोकळ्य़ा व हवेशीर वातावरणात शिक्षण मिळणार आहे.
गोव्यातील पहिली हरित शाळा विठ्ठलापूर सांखळी येथे साकारली जात आहे. विठ्ठलपूरची सरकारी प्राथमिक शाळा ही गोव्यातील एक जुनी मराठी शाळा असून या शाळेमध्ये सर्वाधिक पटसंख्या आहे. या शाळेमध्ये संस्कारक्षम असे शिक्षण दिले जात असून येथील पालक शिक्षक संघटना वर्धमान शेंदुरे यांच्या अध्यक्षतेखाली सक्रिय आहे. ते दरवर्षी असंख्य उपक्रम शाळकरी मुलांसाठी राबवित असतात. या शाळेची इमारत इत्यंत जीर्ण झाल्यानंतर पालकांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली असता व त्यांना लेखी निवेदन सादर केल्यानंतर त्यांनी आजारी असताना देखील या शाळेच्या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करुन मंजूरही केला. सदर प्रस्ताव गोवा पायाभूत विकास महामंडळाकडे सुपुर्द केला आणि त्यांचा आजार वाढलेला असताना त्यांच्याहस्ते पणजीत ऑनलाईनद्वारे प्रकल्पाची कोनशिला बसविण्यात आली व प्रत्यक्षात तत्कालीन सभापती व विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते विठ्ठलापूर येथे कोनशिला बसविण्यात आली.
थंड हवेशीर वातावरण, स्वच्छ सुर्यप्रकाश
सदर प्रकल्पासाठी विद्यमान मुख्य़मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आवश्यक असलेले सर्व सहकार्य केले व चार वर्षानंतर हा प्रकल्प आता साकारत आहे. प्रकल्पाचे उद्घाटन गोवा घटक राज्यदिनी होईल. सदर शाळा प्रकल्प ही गोव्यातील पहिली ग्रीन शाळा ठरणार आहे. त्या ठिकाणी पंख नसले व वीज दिवे नसले तरी देखील मुलांना थंड हवेशीर वातावरण व स्वच्छ सुर्यप्रकाश येईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. शाळेला वेगळ्य़ाच पद्धतीचे दरवाजे बसविण्यात आले आहेत. मोठमोठाल्या खिडक्या आहेत. आकर्षक टाईल्स बसविण्यात आली आहे. शाळा प्रकल्प पूर्ण करुन घेण्यासाठी गोवा पायाभूत महामंडळाचे वास्तुशिल्पकार संदीप चोडणेकर यांनी स्वतः लक्ष घातलेले आहे.
18 रंगानी युक्त रंगीबेरंगी शाळा
ही शाळा मुलांसाठी आकर्षण ठरणार आहे. मोकळ्य़ा वातावरणात हवेशीर आणि शाळेतच तळमजल्यावर मुलांना मुक्तपणे बागडता येईल. 18 रंगानी युक्त अशी ही शाळा आकर्षकपणे रंगविली जात आहे. एकूण 16 वर्ग खोल्या उभारण्यात येत असून यामध्ये मुलांना डान्स वर्गासाठी एक खोली, योग प्रशिक्षणसाठी स्वतंत्र खोली, संगीत शिक्षणासाठी देखील वेगळी खोली. याशिवाय मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कार्यालय, शिक्षक वर्गासाठी स्टाफ रुम. या व्यतिरिक्त सर्वात वरच्या मजल्यावर मुलांना बागडता येईल यासाठी आकर्षक बांधकाम करण्यात आले आहे. अत्याधुनिक पद्धतीची ही शाळा आता साकारली असून येत्या शैक्षणिक वर्षापासून इथे पूर्व प्राथमिक ते पहिलीपर्यंत व पहिली ते चौथीपर्यंत या व्यतिरिक्त नव्या नियमानुसार पुढील वर्षी पाचवीचे वर्गही सुरु होतील.
पालकांचा उदंड प्रतिसाद
नव्याने 150 जणांची नावनोंदणी
येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळेत नावनोंदणी सुरु झाली असून पालकांनीच त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्वत्र त्यासाठी जाहिरातीचे फलक सांखळीत लावण्यात आले आहेत. अगोदरच शाळेत 200 मुले शिक्षण घेत असून यावर्षी नव्याने 150 मुलांची नोंदणी झालेली आहे. या शाळेत 400 मुलांना शिक्षण मिळेश अशी व्यवस्था होईल. पालक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वर्धमान शेंदुरे यांनी याकामी पुढाकार घेतला असून सरकारी शाळेत जास्तीत जास्त मुलांनी प्रवेश घ्यावा यासाठी पालकांना बाजू पटवून दिली जात आहे. मराठीतून संस्कारक्षम शिक्षण घेतल्यास भवितव्यात गोव्यातून चांगले नागरिक निर्माण होतील, असे ते म्हणाले