पुणे : गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील (सर्व्हायकल कॅन्सर) पहिली भारतीय लस लवकरच उपलब्ध होणार आहे. सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियातर्फे विकसित करण्यात आलेल्या या लशीला केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) मान्यता दिली आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली.
गर्भाशय मुखाचा कर्करोग हा स्तनांच्या कर्करोगाखालोखाल महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. ह्यूमन पॅपिलोमा नामक विषाणूमुळे हा कर्करोग होतो. दरवर्षी भारतातील सुमारे एक लाख 22 हजार 844 महिलांना या कर्करोगाचे निदान होते. त्यांपैकी सुमारे 67 हजार, 477 महिलांचा या कर्करोगामुळे मृत्यू होतो.
15 वर्षांवरील वयोगटातील महिलांना या कर्करोगाचा धोका सर्वाधिक आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही लस दिली जाते. मात्र सध्या उपलब्ध असलेल्या लशींमध्ये भारतीय पर्याय नसल्याने हे लसीकरण सर्वसामान्य महिलांच्या आवाक्यातील नाही.
पूनावाला म्हणाले, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी प्रथमच संपूर्ण भारतीय बनावटीची एचपीव्ही लस उपलब्ध होणार आहे. ही लस सर्वसामान्य महिलांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यात येईल. या वर्षांच्या अखेरीस ही लस उपलब्ध करून देण्यात येईल. केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने आमच्या लशीला दिलेल्या परवानगीसाठी आम्ही त्यांचे तसेच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे आभार मानतो, असेही पूनावाला यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : भुशी धरणाकडे जाण्यास सायंकाळी 5 नंतर बंदी