ग्रीन फिल्ड विमानतळासाठीची सारी यंत्रणा सज्ज : मुंबईनंतरचा दुसरा सर्वांत मोठा विमानतळ ठरणार
विशेष प्रतिनिधी /पणजी
मोपा विमानतळ हे स्वप्न नव्हे तर सत्यच! गेली काही वर्षे सुरु असलेल्या मोपा विमानतळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पावर इंडिगो या खासगी विमान कंपनीचे मुंबईहून निघालेले पहिले विमान काल सोमवारी दुपारी धावपट्टीवर उतरले. उपस्थितांनी जोरदार टाळ्य़ा वाजवून या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार बनल्याबद्दल जल्लोष केला. विमानाच्या स्वागतासाठी पाण्याचे ‘रेनबो शॉवर्स विमानावर सोडण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या घटनेचे जोरदार स्वागत केले.
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प होणार होणार म्हणून अनेक वर्षे गाजत होते. प्रत्यक्षात सोमवारी मोपा विमानतळ प्रकल्पाच्या धावपट्टीवर ‘इंडिगो’चे विमान उतरले आणि मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ स्वप्न नसून एक सत्य आहे, हे स्पष्ट झाले.
अधिकारी, कर्मचाऱयांचा जल्लोष
जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. या कंपनीतर्फे हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. मुंबई नंतरचा पश्चिम विभागातील हा दुसरा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे. सध्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले असून प्रकल्प कार्यान्वित करण्यास सज्ज झाला आहे. गेल्याच महिन्यात या विमानतळावर एक छोटे विमान धावण्यात आले. काल सोमवारी इंडिगोचे हे मोठे विमान लँडिंग करत होते, तेव्हा मोपा विमानतळ प्रकल्पावरील कर्मचारी आणि अधिकारी विमानाच्या स्वागतासाठी धावपट्टीच्या बाजूला आले होते. लँडिंग यशस्वी होताच त्यांनी आनंदाने जल्लोष केला. यावेळी पाण्याचे ‘रेनबो शॉवर्स’ विमानावर सोडून स्वागत करण्यात आले.
लवकरच होणार कार्यान्वित
इंडिगो कंपनीचे 320 एअरबस हे विमान धावपट्टीवर दुपारी उतरले. ही केवळ चाचणी होती. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरीता विमानतळावर खास अग्निशामक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. अग्निशामक दलाद्वारे पाण्याचे फवारे सोडण्यात आले. विमानतळाची धावपट्टी विमाने उतरण्यास योग्य असल्याचे यावेळी तंत्रज्ञानांना आढळून आले. या चाचणीनंतर आता भारतीय विमान पत्तन न्यासकडून हिरवा कंदील प्राप्त झाल्यानंतर विमानतळ प्रकल्प कार्यान्वित होईल.
ग्रीन फिल्ड विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक असलेली सारी यंत्रणा न्यू गोवा एअरपोर्ट मोपा येथे सज्ज करण्यात आली आहेत. त्यात सोमवारी घेतलेली चाचणी हा विमानतळ प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी मैलाचा दगड ठरला आहे.
ही तर गोव्याची मोठी यशस्वी झेप : आर. व्ही. शेषन
गोवा जीएमआर इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. व्ही. शेषन यांनी सांगितले की, विमान उतरण्यास आणि उड्डाण करण्यासाठी आवश्यक त्या चाचण्या सोमवारी आम्ही यशस्वीरित्या पूर्ण केल्या. आवश्यक त्या सर्व साधनसुविधा या विमानतळ प्रकल्पावर पूर्ण केल्या जात आहेत. सुरक्षेसाठीच्या सर्व बाजू मजबूत केलेल्या आहेत. या विमानतळ प्रकल्पामुळे गोव्यात मोठय़ा प्रमाणात रोजगार तसेच सामाजिक आणि आर्थिक विकासाची दालने पर्यटन क्षेत्रात आणखी खुली होतील, असेही शेषन म्हणाले.