स्वदेशनिर्मित हेलिकॉप्टर ः पाक सीमेवर ठेवणार नजर, सियाचीनच्या पर्वतांवर करू शकणार लँडिंग
वृत्तसंस्था / जोधपूर
देशातील सर्वात मोठय़ा जोधपूर वायुतळावर स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टर ‘रुद्र’ तैनात केले जाणार आहे. लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची(एलसीएच) स्क्वाड्रन जोधपूरमध्ये तैनात केली जाणार आहे. यापूर्वी जून महिन्यायत सैन्याला याची स्क्वाड्रन मिळाली आहे.
8 ऑक्टोबर रोजी वायुदल दिनी 10 हेलिकॉप्टर हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) मिळणार आहेत. या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे पश्चिम सीमेवरील वायुसामर्थ्य वाढणार आहे. 5 वर्षांपूर्वी स्वदेशी ऍडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरची पहिली स्क्वाड्रन जोधपूरमध्ये तैनात झाली होती. भारत-पाक सीमा आणि भारत-चीन सीमेवर या हेलिकॉप्टरच्या मदतीने नजर ठेवता येणार आहे. सियाचीनच्या पर्वतीय भागात देखील रुद्र हेलिकॉप्टर लँड करू शकते आणि याच्या समोरील भागात गन बसविण्यात आली आहे.
1 जून रोजी भारतीय सैन्याने बेंगळुरमध्ये लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची पहिली स्क्वाड्रन तयार केली होती. पुढील वर्षी यात आणखी भर टाकली जाणार असल्याचे समजते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या कारवायांवर नजर ठेवण्यास या हेलिकॉप्टरची मोठी मदत होणार आहे. सैन्याकडून अजून 95 एलसीएच खरेदी केले जाणार आहेत. या हेलिकॉप्टरच्या 7 युनिट्स तयार केल्या जाणार असुन यातील 7 पर्वतीय क्षेत्रांमध्ये तैनात करण्यात येणार आहेत.
रुद्र हेलिकॉप्टरचा कमाल वेग 268 किलोमीटर प्रतितास इतका आहे. तर हे हेलिकॉप्टर एकाचवेळी 550 किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकते. याचबरोबर हेलिकॉप्टर सलग 3 तास 10 मिनिटांपर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहे. याचबरोबर कमाल 6500 फुटांच्या उंचीपर्यंत पोहोचण्याची यात क्षमता आहे. यात 20 एमएमची गन असून ती हवेतून हवेत अन् हवेतून जमिनीवर मारा करू शकते. तसेच यात चार हार्डपॉइंट्स असून त्यात रॉकेट्स, क्षेपणास्त्रs अन् बॉम्ब एकाचवेळी जोडले जाऊ शकतात.
कारगिल युद्धावेळी भासली गरज
लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर हे ध्रूव हेलिकॉप्टरचे विकसित स्वरुप आहे. 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान अशाप्रकारच्या हेलिकॉप्टरची कमतरता भासली होती. परंतु तेव्हा याच्या विकसित स्वरुपावर काम सुरू होते. सियाचीन, वाळवंट जंगल किंवा हिमालयीन पर्वतरांगा असो या हेलिकॉप्टरने परीक्षणादरम्यान भारतातील सर्वप्रकारच्या भागांमध्ये उड्डाण करण्याची क्षमता दाखवून दिली आहे.
अत्याधुनिक यंत्रणांचा अंतर्भाव
रुद्र हेलिकॉप्टरमधील अत्याधुनिक एव्हियोनिक्स सिस्टीमपासून शत्रू लपून राहू शकत नाही तसेच या हेलिकॉप्टरवर हल्ला करू शकत नाही. ही स्टीम या हेलिकॉप्टरला क्षेपणास्त्राचे टार्गेट ठरताच माहिती पुरवत असते. याचबरोबर रडार अन् लेझर वॉर्निंग सिस्टीमसह शाफ अन् फ्लेयर डिस्पेंसर देखील आहे, याच्या माध्यमातून शत्रूची क्षेपणास्त्रs अन् रॉकेट्स हवेतच नष्ट करता येतील.
पूर्व लडाखमध्ये तैनात
भारतीय वायुदलात पूर्णपणे सामील होण्यापूर्वी या स्वदेशी हेलिकॉप्टर्सचे परीक्षण सियाचिन ग्लेशियरपासून राजस्थानच्या वाळवंटापर्यंत करण्यात आले आहे. औपचारिक स्वरुपात वायुदलात सामील होण्यापूर्वी दोन रुद्र हेलिकॉप्टर्स पूर्व लडाखला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात आलेली आहेत.