ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नायजेरियात मंकीपॉक्स आजारामुळे एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण शारिरीकदृष्टय़ा कमजोर आणि अनेक व्याधींनी ग्रस्त असल्याचे नायजेरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने म्हटले आहे.
नायजेरियात सप्टेंबर 2017 पासून मंकीपॉक्सचा फैलाव झाला नव्हता. दरम्यान, अलीकडच्या काळात नायजेरियाच्या 36 पैकी 22 राज्यांमध्ये या रोगाची 247 प्रकरणे आढळली आहेत. यामध्ये मृत्यू दर 3.6 टक्के आहे. युरोप, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल, स्पेन यासह एकूण 20 देशात या रोगाचा प्रसार झाला असून, जवळपास 200 रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी आफ्रिकेबाहेर मंकीपॉक्सचे इतके रुग्ण कधीच आढळले नव्हते. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनेही या रोगाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, नायजेरियातून ब्रिटनला गेलेल्या एका व्यक्तीला 4 मे रोजी मंकीपॉक्स रोगाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. या ब्रिटिश नागरिकाने देश सोडल्यानंतर नायजेरियामध्ये मंकीपॉक्सच्या सहा प्रकरणांची नोंद झाली. सीडीसीचे प्रमुख डॉ. इफेडायो अदेतिफा यांनी सांगितले की, नायजेरियामध्ये ब्रिटीश नागरिकाला संसर्ग झाल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. नायजेरिया मंकीपॉक्सच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी तयार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मंकीपॉक्स तज्ज्ञ डॉ. रोजमंड लुईस यांनी म्हटलं आहे की, मंकीपॉक्सचा आजार महामारीचं रूप घेईल, असं त्यांना वाटत नाही, परंतु शास्त्रज्ञांना अद्याप मंकीपॉक्सबद्दल फारशी माहिती नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.