वृत्तसंस्था/ टेरेसा (स्पेन)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने आपला पहिला विजय नोंदविला. मंगळवारी विविध स्थानासाठी सुरू असलेल्या सामन्यात भारताने कॅनडाचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात 11 व्या मिनिटाला मॅडेलिने सेकोने कॅनडाचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत कॅनडाने भारतावर 1-0 अशी आघाडी राखली होती. सामना संपण्यास दोन मिनिटे असताना सलमा टेटेने (58 व्या मिनिटाला) गोल नोंदवून भारताला बरोबरी साधून दिली. निर्धारीत कालावधीत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत राहिल्याने पंचांनी पेनल्टी शुटआऊटचा अवलंब केला. या सामन्यामध्य्ये भारतीय संघाची कर्णधार आणि गोलरक्षक सविताने पेनल्टी शुटआऊटमध्ये कॅनडाचे सहा फटके अडविले. भारतातर्फे नवनीत कौर, सोनिका आणि नेहा यांनी पेनल्टी शुटआऊटमध्ये गोल नोंदविले. 9 ते 16 स्थानासाठी या स्पर्धेतील सामने खेळविले जात आहेत. भारतीय महिला संघाला स्पेनकडून पराभव पत्करावा लागल्याने पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. मंगळवारच्या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर देत कॅनडावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. कॅनडाला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्यांना त्याचा लाभ घेता आला नाही. नवव्या मिनिटाला कॅनडाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. या संधीचा कॅनडाने पुरेपूर फायदा उठविला. कॅनडाच्या सेकोने भारतीय बचावफळीला हुलकावणी देत आपल्या संघाचे खाते उघडले. कॅनडाने खाते उघडल्यानंतर भारतीय संघ अधिकच आक्रमक खेळ करू लागला. सामन्याच्या दुसऱया सत्रात भारताच्या आघाडीफळीने अनेक चाली रचल्या पण त्यांना गोल करता आला नाही. भारतीय संघातील मोनिकाचा खेळ अधिक आक्रमक झाला. मध्यंतरापर्यंत कॅनडाने भारतावर 1-0 अशी आघाडी कायम राखली होती. सामन्याच्या तिसऱया सत्रात भारताच्या नवज्योत कौरचा फटका कॅनडाच्या गोलपोस्टवरून गेल्याने भारताला बरोबरी साधता आली नाही. कर्णधार सविताने कॅनडाचा आणखी एक पेनल्टी कॉर्नर थोपवून त्यांना आघाडी वाढविण्यापासून रोखले. भारतीय संघातील गुरजित कौरला पेनल्टी कॉर्नरचा लाभ उठविता आला नाही. 58 व्या मिनिटाला सलिमा टेटेने गोल नोंदवून भारताला बरोबरी साधून दिली. आता 9 ते 12 व्या स्थानासाठी भारताचा पुढील सामना जपानबरोबर बुधवारी खेळविला जाईल.