कणबर्गीच्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून मदत
प्रतिनिधी / बेळगाव
येळ्ळूर येथील सुहानी हुवाण्णावर ही मुलगी किडनी विकाराने त्रस्त आहे. तिला मदतीचा ओघ सुरू असून बुधवारी कणबर्गी येथील अभियंते विजय पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शहापूरकर यांनी तिला आर्थिक मदत केली. त्यामुळे त्या मुलीच्या कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला.
सुहानी हिच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिच्यावर उपचार करणे अशक्मय झाले आहे. त्यामुळे त्यांनी मदतीची मागणी केली होती. त्यानुसार तरुण भारतमधून आवाहन करण्यात आल्यानंतर मदत सुरू झाली आहे.
प्रथम येळ्ळूरचे अभियंते हणमंत कुगजी यांनी 25 हजार रुपये दिले. त्यानंतर विविध संघटनांनी तिच्या घरी जाऊन आर्थिक व जीवनावश्यक वस्तु दिल्या आहेत.
कणबर्गी येथील अभियंते विजय पाटील यांना त्या विद्यार्थिनीच्या परिस्थितीची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने 5 हजार रुपयांचा धनादेश दिला. प्रशांत शहापूरकर यांनी 2 हजार रुपये तिच्या वडिलांच्या बँक खात्यावर ऑनलाईनद्वारे जमा केले. त्यांच्या या मदतीबद्दल मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांचे आभार व्यक्त केले.