Tarun Bharat

रशियावरून विदेशमंत्र्यांनी युरोपला सुनावले

युरोप ठरवू शकत नाही आमच्या गरजा ः रशियाकडून तेलआयातीचा मुद्दा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रशियाकडून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या आयातीच्या मुद्दय़ावर विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी युरोपला आरसा दाखविला आहे. भारताच्या ऊर्जा गरजा केवळ भारतच निश्चित करणार आहे. युरोप किंवा अन्य कुठलाही देश भारताला याप्रकरणी काही सांगू शकत नाही. रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची आयात युरोपनेच केल्याने जयशंकर यांनी युरोपीय देशांना सुनावले आहे. जर्मनीच्या विदेशमंत्री एनालेना बेयरबॉक यांच्या उपस्थितीत जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.

भारताच्या ऊर्जाविषयक गरजा केवळ भारतच ठरविणार आहे. ही प्राथमिकता युरोप किंवा अन्य कुठलाच देश निश्चित करू शकत नाही. युरोप स्वतः जे करतो ते भारताला न करण्यासाठी कसे सांगू शकतो? रशियाकडून युरोपच सर्वाधिक आयात करत आहे. पाश्चिमात्य देशांची कच्च्य तेलाची आयात भारताच्या तुलनेत 5-6 पट अधिक आहे. नैसर्गिक वायूची आयात तर कितीतरी पटीने अधिक आहे. कोळसा आयात भारताच्या तुलनेत 50 टक्के अधिक असल्याचे जयशंकर यांनी सुनावले आहे.

विदेशमंत्री एस. जयशंकर आणि जर्मनीच्या विदेशमंत्री एनालेना बेयरबॉक यांनी सोमवारी ऊर्जा, व्यापार आणि हवामान बदलाच्या मुद्दय़ासह द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावरून विस्तृत चर्चा केली आहे. बेयरबॉक दोन दिवसीय दौऱयानिमित्त सोमवारी भारतात पोहोचल्या आहेत. भारताने जी20 गटाचे औपचारिक अध्यक्षत्व स्वीकारले असताना त्यांचा हा दौरा होतोय.

भारत हा जर्मनीचा नैसर्गिक साथीदार आहे. 21 वे शतक, विशेषकरून हिंद-प्रशांत क्षेत्रात जागतिक व्यवस्थेला आकार प्रदान करण्यात भारताची निर्णायक भूमिका असणार आहे. भारताचा दौरा करणे म्हणजे जगाच्या सहाव्या हिस्स्याचा प्रवास करण्यासारखे असल्याचे उद्गार जर्मनीच्या विदेशमंत्री बेयरबॉक यांनी काढले आहेत.

भारत सरकारने जी20 मध्ये स्वतःसाठी महत्त्वाकांक्षी लक्ष्य राखले आहे. नुतनीकरणीय ऊर्जेप्रकरणी भारत पूर्वीपेक्षा अधिक वेगाने वाटचाल करू पाहत असून यात जर्मनीचे भारताला सहकार्य असणार आहे. हवामान बदल संकटामुळे आम्ही सर्वजण प्रभावित झालो आहोत. युरोप आणि भारतातही उपजीविकेला नुकसान पोहोचले आहे, अशा स्थितीत आम्ही आर्थिक, हवामान क्षेत्र आणि सुरक्षा धोरणावरून स्वतःच्या सहकायांला सामरिक आघाडीच्या स्तरावर नेऊ इच्छितो असे बेयरबॉक यांनी म्हटले आहे. जयशंकर आणि बेयरबॉक यांच्या चर्चेत चीनसोबतचे संबंध आणि युक्रेन-रशिया युद्धाचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

Related Stories

पुलवामात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

युजीसीकडून नवी साक्षरता मोहीम

Patil_p

वाराणसीतून निवडणूक लढविणार ओमप्रकाश

Patil_p

देशात 1.50 कोटी लोक कोरोनाच्या विळख्यात

datta jadhav

भारताची ओळख आता कणखर राष्ट्र!

Patil_p

निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली

Patil_p