Tarun Bharat

स्वातंत्र्यलढा हा त्याग, तप अन् बलिदानाचा इतिहास

स्वातंत्र्यसेनानी अल्लूरी सीताराम राजू यांच्या पुतळय़ाचे अनावरण

वृत्तसंस्था / भीमावरम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रप्रदेशच्या भीमावरममध्ये महान स्वातंत्र्यसेनानी अल्लूरी सीताराम राजू यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित सोहळय़ात भाग घेतला आहे. अल्लूरी सीताराम राजू यांच्या 30 फूट उंचीच्या पुतळय़ाचे त्यांनी अनावरण केले. यावेळी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी उपस्थित होते. स्वातंत्र्यलढा हा केवळ काही वर्षांचा, काही भागांचा किंवा काही लोकांचा इतिहास नाही. हा इतिहास भारताच्या कानाकोपऱयाचा, कण-कणाच्या त्यागाचा, तप आणि बलिदानांचा इतिहास असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.

आंध्रप्रदेश ही वीर अन् देशभक्तांची भूमी आहे. येथे पिंगली व्यंकय्या, कन्नेगंटी हनुमंत, कन्दुकुरी वीरेशलिंगम, पोट्टी श्रीरामलू यासारखे नायक होऊन गेले. सीताराम राजू गारू यांनी विदेशी राजवटीच्या अत्याचारांच्या विरोधात युद्ध सुरू केले होते, तेव्हा त्यांचे वय केवळ 24-25 वर्षे होते. वयाच्या 27 व्या वर्षी ते भारतमातेसाठी हुतात्मा झाले. रम्पा क्रांतीत भाग घेणाऱया कितीतरी तरुण-तरुणींनी अशाचप्रकारे स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतला होता, असे मोदींनी म्हटले आहे.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशात आदिवासी गौरव आणि वारसा प्रदर्शित करण्यासाठी आदिवासी संग्रहालय निर्माण केले जात आहे. आंध्रप्रदेशात लंबसिंगीमध्ये ‘अल्लूरी सीताराम राजू स्मारक आदिवासी स्वातंत्र्यसेनानी संग्रहालय’ उभारण्यात येत आहे. आज अमृतकाळात या सेनानींच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची जबाबदारी आम्हा देशवासीयांची आहे. आमचा नवा भारत त्यांच्या स्वप्नांतील भारत असायला हवा. एक असा भारत ज्यात गरीब, शेतकरी, मजूर, मागास, आदिवासी या सर्वांसाठी समान संधी असेल असे मोदी म्हणाले.

आमच्यासाठी प्रेरणादायक

सीताराम राजू गारू हे भारताच्या सांस्कृतिक आणि आदिवासी ओळख, भारताचे आदर्श तसेच मूल्यांचे प्रतीक आहेत. त्यांचे जीवन आम्हा सर्वांना प्रेरणा देणार आहे. भारताच्या अध्यात्माने सीताराम राजू गारू यांना करुणा आणि सत्याचा बोध दिला. आदिवासी समुदायासाठी समभाव आणि ममभाव दिला. त्याग अन् साहसप् दिल्याचे मोदींनी म्हटले आहे.

*

तरुणाईसाठी उत्तम संधी

स्वातंत्र्य लढय़ात तत्कालीन तरुण-तरुणींनी पुढे येत नेतृत्व केले होते. आज नव्या भारताच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी तरुणाईकडे सर्वात उत्तम संधी आहे. देशात नवी क्षेत्रे खुली होत असून नवी मानसिकता आणि नव्या संधी जन्म घेत आहेत. स्किल इंडिया मोहिमेद्वारे आता आदिवासी कला-कौशल्याला नवी ओळख मिळत आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ आदिवासी कला-कौशल्याला उत्पन्नाचे नवे साधन ठरवत आहे. कित्येक दशके जुने कायदे बदलून आदिवासींना वनोत्पन्नाचे अधिकार देण्यात आल्याचे मोदी म्हणाले.

स्वातंत्र्यसेनानींच्या कन्येला नमन

सभेला संबोधित केल्यावर मोदींनी आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी पसाला कृष्णमूर्ती यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी यावेळी कृष्णमूर्ती याच्या कन्या पसाला कृष्ण भारती यांच्या चरणांना स्पर्श करत आशीर्वाद घेतले आहेत. कृष्ण भारती या 90 वर्षांच्या आहेत.

Related Stories

गौतम अदानी जगात दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती

Patil_p

युक्रेनच्या अध्यक्षांशी पंतप्रधान मोदींची चर्चा

Patil_p

राम रहीमला मिळाला 30 दिवसांचा पॅरोल

Patil_p

बंगालच्या उपसागरात ‘मॅन्दोस’ वादळाची निर्मिती

datta jadhav

अमरनाथ यात्रेच्या मार्गावर चकमक

Patil_p

भाजप आमदार उंटवाल यांचे निधन

Patil_p
error: Content is protected !!