Tarun Bharat

भिक्षुगीतेच्या श्रवणाचे फळ

अध्याय तेविसावा

भगवंत म्हणाले, उद्धवा खरी आत्मशांती मनांत बिंबली की, कोणताही भेदभाव पीडा देत नाही. मोठमोठाले सिद्ध व योगी याला ‘योगसंग्रह’ म्हणतात. संसाराची स्फूर्ति सोडून चित्स्वरूपाकडे वृत्ती जडते आणि जीव-शिव एकत्र येतात, त्याचेच नाव ‘योगसंग्रहस्थिती’ होय. अशी योगसंग्रहाची शांती प्राप्त झाली असता साधकांना विषय त्रास देत नाहीत. हे ब्रह्मज्ञान जो कोणी एकाग्रतेने ऐकतो, दुसऱयांना ऐकवतो आणि यानुसार वागतो, तो कधीही सुखदुःखादी द्वंद्वाने खचून जात नाही. शांती प्राप्त करून घेण्याकरिता कोटय़वधि साधने केली, तरी शांती प्राप्त होत नाही. परंतु ह्या भिक्षुगीतेतील रहस्य मनात बाळगले असता साधकांना आपोआपच शांती प्राप्त होते. योगनि÷ा आणि ब्रह्मज्ञान, म्हणजेच हे भिक्षुगीतातील निरूपण होय. जो हे लक्षपूर्वक ध्यानात धरतो त्याची शांती ही दासी होते. ह्या भिक्षुगीतेतील गुह्यार्थ जो स्वस्थचित्ताने लक्षात ठेवतो, त्याला द्वंद्वाची बाधा होत नाही आणि आत्मज्ञानाने तो अत्यंत शांत होतो.

भिक्षुगीतेच्या रहस्याप्रमाणे वागल्याने समाधान होईल हे सांगण्यात आश्चर्य काय? पण जो भक्तिपूर्वक त्याचे श्रवण करेल, त्यालासुद्धा द्वंद्वे पीडा देणार नाहीत. पती पुष्कळ दिवस परदेशाला गेला असता त्याच्याकडून आलेले पत्र त्याची स्त्री जशी उत्कंठेने ऐकत बसते, त्याप्रमाणे अत्यंत एकाग्रतेने भिक्षुगीता ऐकावी. मुलगा घरातून पळून गेला असता, त्याचा सर्व शोध लागल्याचे कोणी आईला सांगितले. म्हणजे तो पळून जाण्याचा हेतु वगैरे ऐकून ती जशी चरफडून विव्हळ होते अशा वेळी तिच्याजवळ ज्या नातेवाईक स्त्रिया असतात, त्याही स्नेहाने कळवतात पण आई जशी मनात तळमळते, तसे तळमळणे इतरांच्या मनात असत नाही. त्याप्रमाणे भिक्षुगीताचे श्रवण करीत असता ज्याचे मन द्रवते, जो सात्त्विक वृत्तीने पूर्णपणे भरून जातो, तो द्वंद्वांच्या सपाटय़ात सापडत नाही. असो. असे आदरपूर्वक श्रवण घडत नसेल तर ह्याचे नित्य पठण केले असताही ह्या भिक्षुगीताच्या प्रभावाने द्वंद्वे त्याला शिवतसुद्धा नाहीत. सिंहाच्या अंगाचा दर्प बाहेर पडला की, मदोन्मत्त हत्तीही पळत सुटतात, त्याप्रमाणे भिक्षुगीताच्या पठणाने द्वंद्वांची पळापळ होते. मनामध्ये निर्लोभ होऊन साधुसंतांपाशी बसून जो भिक्षुगीताचे विवरण करील, त्याला द्वंद्वे शिवणारही नाही. ह्या भिक्षुगीतेतील अर्थाचे किंवा या भिक्षुगीतापाठाचे श्रवण केले असता ही भिक्षुगीता द्वंद्वांचे निवारण करते. हे वर्म श्रीकृष्णाला कळले होते. ते त्याने उद्धवाच्या कल्याणाकरिता त्याला सांगितले. नाथमहाराज म्हणतात, ज्या भिक्षुच्या गीताची फलश्रुती श्रीकृष्ण आपल्याच मुखाने सांगत आहे, त्या भिक्षूचे भाग्य किती वर्णन करू? त्रिभुवनात तोच एक धन्य होय. विवेक आणि वैराग्य ही अंगामध्ये बिंबवून घेऊन जो मोठमोठय़ा द्वंद्वांना सहन करतो, तोच  भगवंताचा आवडता होतो, हे उद्धवाला भगवंतांनी दाखवून दिले. उद्धवामुळे हे सर्वांना समजले. उद्धवाचा उपकार सर्व जगावर झाला आहे. कारण त्याच्याकरिता श्रीकृष्णाने आपल्या गुह्य व परात्पर ज्ञानाचे भांडार उघडून भिक्षुगीताचे रहस्य प्रगट केले आणि हाच जडजीवांना उद्धरण्याचा मार्ग झाला. ह्या उपायाने दीनदुबळे तरून जातात. जगजीवन असा जो श्रीकृष्ण, तो सर्व जगाचा उद्धार करण्याकरताच उद्धवाच्या निमित्ताने हे बोलला. श्रीकृष्णाने असे हे भिक्षुगीत सांगितले आहे, जे वेदशास्त्रांचे तात्पर्य, उपनिषदांचे सार आणि गूढ रहस्य आहे. ह्याच्या योगाने जीवाचे जीवपण नाहीसे होते, शिवाचे शिवपण बुडून जाते, द्वंद्वांचा पीडा देण्याचा गुण नाहीसा होतो आणि आत्मानंदाचे भांडार खुले होते. ज्याप्रमाणे जळात बुडणारे दगड श्रीरामाने स्वतः तरवले, त्याप्रमाणे मी जड, मूढ व अज्ञानी असताही जनार्दनाची कृपा माझ्याकडून ब्रह्मज्ञान बोलवीत आहे. सद्गुरूच्या कृपेची ही करणी आहे. माझी प्राकृत, जड व मूढ वाणी साधु व ज्ञाते ह्यांनी मान्य करावी अशीच भाषणे त्या कृपेने माझ्याकडून वदवली आहेत. एका हा जनार्दनाला शरण आहे. पुढच्या अध्यायात श्रीकृष्ण प्रकृति-पुरुषांची लक्षणे सांगणार आहेत.

तेविसावा अध्याय समाप्त

Related Stories

शेतकरी स्वातंत्र्य आणि महाराष्ट्र!

tarunbharat

जी. एम. वांग्यांचे सामाजिक-आर्थिक परिणाम

Patil_p

कोकणातल्या चित्रकथीचे संचित

Patil_p

पर्यावरणीय शाश्वततेच्या प्रवासाचा वेग वाढविण्याची गरज

Patil_p

दरवर्षाची तीच कहाणी

Patil_p

महाकवी नाटककार शूद्रकाचे ‘मृच्छकटिक’ (11)

Patil_p