पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी /पणजी
पंचायत निवडणुकीसाठी 2013 च्या जणगणनेनुसार ओबीसी वॉर्ड आरक्षित करण्याकरिता तपशील देण्याची तयारी ओबीसी आयोगाने दर्शविली असून त्यावरच पंचायत निवडणुकीची तारीख अवलंबून आहे, असे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.
ते म्हणाले की, ओबीसी आयोगाने सदर तपशील राज्य सरकारकडे पाठवावा. त्यावर सरकार आणि राज्य निवडणूक आयोग तातडीने निर्णय घेतील. सरकारला सदर निवडणूक पुढे ढकलण्याची इच्छा नाही किंवा सरकार टाळाटाळ करते असेही नव्हे पण न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तिहेरी चाचणी प्रमाणे वॉर्डचे आरक्षण झाले पाहिजे. त्यामुळे हा विषय आता ओबीसी आयोगाकडे गेला असून तेथून कोणता अहवाल येतो त्यावरच पंचायत निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे, असे गुदिन्हो यांनी नमूद केले.
न्यायालयाच्या आदेशाचे पालन
न्यायालयाचे निर्देश पाळणे आणि त्यानुसार कृती करणे भाग आहे. सर्व राज्ये त्याचा पाठपुरावा करीत असून गोवा देखील त्याचे पालन करणार आहे. आता ओबीसी आयोगाने कृती करण्याची गरज असून त्यानंतरच काय ते निश्चित ठरवता येणार आहे. पंचायत निवडणूक घेण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची असून सरकार त्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही, असेही ते म्हणाले.
ओबीसी आयोगाचे स्पष्टीकरण
ओबीसी आयोगाला राज्य सरकारकडून ओबीसी वॉर्ड आरक्षणासाठी कोणतीही फाईल आली नसल्याचा खुलासा आयोगाचे अध्यक्ष मनोहर आडपईकर यांनी केला आहे. वर्ष 2013 च्या जनगणनेनुसार ओबीसी तपशील सरकारकडे पाठविण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. आता थोडक्यात म्हणजे पंचायत निवडणुकीचा चेंडू ओबीसी आयोगाच्या पारडय़ात असल्य़ाचे स्पष्ट झाले आहे.