सांखळीत सेसा गोवा कामगार संघटनेच्या खास बैठकीत विश्वास व्यक्त
प्रतिनिधी /सांखळी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कामगारांच्या समस्यांबाबत तसेच अवलंबितांसह खाण पट्टय़ातील नागरिकांच्या दुःखाची पूर्णपणे जाणीव आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीच यावर तोडगा काढू शकतात, असा विश्वास कामगार संघटनेचे सचिव रमेश सिनारी यांनी व्यक्त केला. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर खाणांचा लिलाव करून कामगारांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी अध्यक्ष देवानंद परब, उपाध्यक्ष अनंत गावस, दीपक परब, प्रसाद गावस, प्रेमानंद सावंत, नीरज गावस, लक्षदीप अरसेकर, प्रदीप गावकर, संजय नाईक, दिगंबर खेडेकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
सेसा गोवा कंपनीने कामगार कपातीची नोटीस पाठविल्यानंतर कामगारांसमोर उपजीविकेबाबत मोठे संकट उभे राहिले आहे. यावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी सेसा गोवा कामगार युनियनची एक खास बैठक सांखळी रवींद्र भवनात सभागृहात आयोजित करण्यात आली होती. कामगार कपात कशी रोखली जावू शकते व पुढील कृती काय असावी या विषयावर सदर बैठकीत चर्चा करण्यात आली.
आमोणे, सोनशी, कोडली, वास्को व चित्रदुर्ग या भागातील खाणीवर सदर संघटनेचे सुमारे साडेआठशे कामगार काम करत आहेत. मुख्यमंत्री डॉ सावंत यांच्या कडूनच आता कामगारांना शेवटची आशा आहे, असे युनियनचे अध्यक्ष देवानंद परब यांनी सांगितले.
या बैठकीत सहाशे कामगारांचा सहभाग होता. कायदेशीर लढा देण्यासाठी आम्ही सज्ज होणार आहोत, असेही यावेळी कामगारांनी बोलून दाखविले.