-नेत्रदीपक यशानंतर श्रेया कदमची मनीषा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
आत्मविश्वासाच्या जोरावर परीक्षेला समोर गेले. अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनही खूप उपयोगी पडले. तसेच अभ्यासातील चिकाटी, सातत्य व शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाच्या जोरावरच आपण मोठय़ा यशाला गवसणी घातल्याचे श्रेया सागर कदम हिने सांगितले. दहावी परीक्षेतील घवघवीत यशानंतर आता शास्त्र शाखा निवडून वैद्यकीय क्षेत्रात भविष्य घडवायचे असल्याची इच्छा तिने नमूद केली.
रत्नागिरीच्या सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी श्रेया सागर कदम हिने दहावी परीक्षेत 100 टक्के गुणांसह जिह्यात व कोकण बोर्डात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशानंतर श्रेया कदम हिने वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. यानंतर पुढे ती म्हणाली की, या यशामागे माझी आई सोनल कदम, वडील सागर कदम तसेच खास करून शाळेतील माझे शिक्षक तसेच शाळेव्यतिरिक्त अपूर्वा ताई व पित्रे मॅडम यांचेही मला विशेष सहाय्य, मार्गदर्शन लाभले. प्रत्येक विषयाशी निगडित असणारी शालेय पाठय़पुस्तके मी वाचलीच. पाठय़पुस्तके वाचताना ती आपल्याला पाठ करायची आहेत, या भावनेने न वाचता ती आपल्याला समजून घ्यायची आहेत, अशारितीने वाचली. ज्याचा उपयोग मला प्रत्यक्ष परीक्षेवेळी झाला. तसेच आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर नाताळ यांनीही पेपर कसा लिहावा, अभ्यास कशारितीने करावा, या बाबत व अभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱया प्रत्येक शंकेचे निरसन केले. अभ्यासासाठी घरातील सगळ्य़ांनी नेहमीच केलेली मदत फार मोलाची ठरली.
यावेळी तिची आई सोनल कदम यांनी श्रेयाने आधीपासूनच अभ्यास व त्याला आवश्यक असणाऱया वाचनाला महत्त्व दिले. यामुळेच व तिच्या शाळेच्या खंबीर पाठिंब्यामुळे हे यश तिला मिळाल्याचे आवर्जून सांगितले.