मुलांच्या संघाला उपविजेतेपद
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे युवजन क्रीडा खाते व मिनी ऑलिम्पिक संघटना कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱया मिनी ऑलिम्पिक क्रीडा महोत्सवात बेळगावच्या 14 वर्षाखालील बेळगाव जिल्हा मुलींच्या संघाने हावेरी संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले तर मुलांच्या संघाने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले.
बेंगळूर येथे झालेल्या खो खो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मुलींच्या संघाने धारवाड संघाचा 1 गुणाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आज सकाळी झालेल्या अंतिम सामन्यात मुलींच्या संघाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत हावेरी संघाचे 8 गडी टिपले तर हावेरी संघाला 5 गडीच टिपता आले. त्यामुळे हा सामना बेळगाव जिल्हा संघाने 3 गडय़ांनी जिंकून अजिंक्मयपद पटकाविले. या संघात आश्मा खान, सुनीता कामती, सरोजा नाडगौडर, पूजा धास्ती, मेघा नाडगौडा, गायत्री मक्कलगिरी, अतुजा सिद्दणाळ, दीपा बडीवड्डर, हर्षदा पांडुचे, तनुजा मुक्कण्णावर, आदिती बिजगरकर, समीक्षा शहापूरकर, रसिका सावंत, वैदेही पाटील, तृप्ती मायण्णा या खेळाडूंचा समावेश आहे.
मुलांच्या उपांत्य सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने म्हैसूर जिल्हा संघाचा 3 गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र अंतिम फेरीत विजापूर संघाने बेळगाव जिल्हा संघाचा 5 गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकाविले. त्याआधी पात्रता फेरीत बेळगाव जिल्हा संघाने विजापूरचा पराभव केला होता.
या दोन्ही संघांना सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र व पदके देवून गौरविण्यात आले. त्यांना एल. सी. लमाणी, नितीन नाईक, एम. एस. सिद्दाणी, हल्लोळी व मेघा यांचे मार्गदर्शन लाभत आहे.