तालुक्याच्या पश्चिम भागातील ग्रा.पं.मधील प्रकार : पीडीओ-अध्यक्षांच्या कारभाराने संताप : कंत्राटदारांकडून होतेय 10 ते 15 टक्क्यांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
ग्राम पंचायत आणि तेथील कारभारी यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. विशेषकरून काम करणाऱ्या कंत्राटदारांची चांगलीच वाताहत होत आहे. कामे करायची आणि केलेल्या कामांचे पैसे मिळविण्यासाठी चप्पल झिजवायच्या, अशी अवस्था आहे. सध्या बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील एका ग्रा.पं.च्या कारभारामुळे कंत्राटदार अक्षरश: वैतागले आहेत. पीडीओ आणि अध्यक्ष या जोडगोळीचा कारभार अनेकांना त्रासदायक ठरत आहे. यात भर म्हणजे अध्यक्षांच्या नवरोबाचा हस्तक्षेप गावच्या विकासाला मारक ठरत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, बंटी-बबलीची करामत कंत्राटदारांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे.
मध्यंतरी कर्नाटक राज्यात 40 टक्के कमिशनवरून मोठा गोंधळ माजला होता. ही गोष्ट केवळ राज्याचीच नसून आता ग्रा.पं. स्तरावरही ही बाब सामोरी येत आहे. दरम्यान, या टक्केवारीमुळे काही कंत्राटदारांनी आत्महत्याही केली आहे. असे असूनही यामध्ये सुधारणा काही होत नाही. कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणात टक्केवारी उकळत असल्याचे प्रकार निदर्शनास आले तरी संबंधित ता. पं. आणि जि. पं.चे वरिष्ठ अधिकारी मूग गिळून गप्प आहेत. साधारणत: अध्यक्ष, पीडीओ व इतर अधिकारी मिळून 10 टक्के कमिशन योग्य आहे. काही ग्रा. पं.मध्ये आता पीडीओ 5 टक्के, अध्यक्ष 10 टक्के, काही कारकून व सदस्य आणि अभियंत्यांना 5 टक्के, यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही टक्केवारी मिळून एखाद्या कामाचे अर्ध्याहून अधिक पैसे टक्केवारीत जात असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सध्या संबंधित ग्रा. पं. पीडीओ आणि अध्यक्षाची गट्टी जमल्याची जोरदार चर्चा आहे. ज्या ठिकाणी पीडीओची सही पाहिजे त्या ठिकाणी भलत्यांच्याच सह्या असल्याचे दिसून येत आहे. याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत असून हा प्रकार लवकरच निदर्शनास येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पीडीओच्या ठिकाणी दुसऱ्याने सही केली तरी ही बाब सामोरी येऊनही त्याबाबत मात्र गुप्तता बाळगल्याचे समजते.
कारभाऱ्याचेच अधिक लक्ष
महत्त्वाचे म्हणजे अध्यक्षांच्या कारभाऱ्याचेच अधिक लक्ष ग्रा. पं.मध्ये दिसत आहे. कोणतेही काम ते स्वत:च्या घराकडे करत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांना अध्यक्षांच्या घराकडे जाणे भाग पडत आहे. या प्रकाराकडेही आता लक्ष द्यावे, असेही बोलले जात आहे. तेव्हा टक्केवारीवरून सध्या त्या ग्रा.पं.चे नाव मात्र चर्चेत आहे.
नको ते सल्ले देण्यात माहीर
बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील एका ग्रा. पं.मध्ये असे प्रकार सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान, या ग्रा.पं.मधील पीडीओच्या कारभारामुळे नागरिक व कंत्राटदार अक्षरश: वैतागले आहेत. कोणतेही काम न करता नको ते सल्ले देण्यात या पीडीओने धन्यता मानली आहे. पीडीओच्या या कारभाराला सदस्यही वैतागले आहेत. यापूर्वीही या पीडीओच्या अनेक तक्रारींमुळे ग्रा. पं.मधून अनेकांनी बदली करून घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आताही त्यामध्ये सुधारणा झाली नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.