40 टक्क्यांनी कमी झाले प्रेक्षक, एंटरटेन्मेंट कंपन्या कर्जात बुडाल्या
अमेरिकेत टीव्ही वाहिन्यांचे सुवर्णयुग समाप्त होताना दिसून येत आहे. 2019 च्या तुलनेत सुमारे 40 टक्के प्रेक्षकांनी टीव्ही पाहणे सोडून दिले आहे. युटय़ूब-फेसबुक यासारख्या मोठय़ा कंपन्यांनीही स्वतःचे टीव्ही वाहिन्यांसाठीचे प्रकल्प बंद केले आहेत. मालिका तयार करणाऱया बहुतांश कंपन्या कर्जात बुडाल्या आहेत. चालू वर्षाच्या प्रारंभी देण्यात आलेल्या 350 हून अधिक नव्या टीव्ही शोंचे ऑर्डर्स रद्द करण्यात आल्या आहेत.
अमेरिकेची प्रख्यात संशोधन कंपनी एम्पीयर ऍनालिलिसच्या अहवालानुसार मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षाच्या प्रारंभिक 6 महिन्यांमध्ये प्रेक्षकांची संख्या 24 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. दशकात पहिल्यांदाच नेटफ्लिक्सच्या प्रेक्षकांची संख्याही घटली आहे. एंटरटेन्मेंट कंपन्यांचे समभाग कोसळले आहेत.
कंपन्यांनी स्वतःच्या केबल व्यवसायाच्या तोटय़ाला स्ट्रीमिंगद्वारे भरून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु विशेष यश मिळाले नाही. डिस्नेसारख्या कंपनीला स्वतःच्या स्ट्रीमिंग विभागामुळे 12.5 हजार कोटी रुपयांचा तोटा झाला. कंपनीने सीईओ बॉब शॅपेक यांना हटविले. आता गुगल, ऍपल, अमेझॉन आणि ईएसपीएन यासारख्या कंपन्या एनएफएल गेम्सचे स्ट्रीमिंग करू पाहत असल्याची माहिती एम्पीयरमधील संशोधन व्यवस्थापक प्रेड ब्लॅक यांनी दिली आहे.
जाहिराती घटल्या, कर्मचारी कपात
एंटरटेन्मेंट कंपन्यांनी जाहिरातींचे दरही कमी केले आहेत. सर्व कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. अन्य खर्चातही कपात केली जात आहे. ऍप्पल टीव्ही प्लस सीरिजचे निर्माते जे. कार्सोन यांनी स्वतःकडे सध्या अनेक प्रोजेक्ट असले तरीही एंटरटेन्मेंट बाजार अचानकपणे संपत चालल्याचे उद्गार काढले आहेत. 4-5 वर्षांपूर्वी टीव्ही क्षेत्र प्रगतीच्या शिखरावर होते. फोनवरून कार्यक्रमांच्या ऑर्डर दिल्या जात होत्या. वॉर्नर ब्रदर्स, डिस्कव्हरी, पॅरामाउंट समवेत केवळ 3 मोठय़ा कंपन्यांच्या टीव्ही कार्यक्रमांच्या ऑर्डर्स 22-27 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. लोकांचा आता स्क्रिप्टेड मालिकांबद्दल मोहभंग झाल्याचे एनबीसी एंटरटेन्मेंट अँड वॉर्नर मीडियाचे माजी प्रमुख रोबर्ट ग्रीनब्लॅट यांनी म्हटले आहे.
भारतातही संख्या घटली अमेरिकेतच नव्हे तर भारतातही टीव्हीचे प्रेक्षक कमी होत आहेत. स्टॅटिस्टानुसार कोरोनापूर्वी 2018 मध्ये सुमारे 1.60 लाख कोटी सरासरी मिनिट ऑडियन्स (एएमए) होते. 2019 मध्ये 1.61 लाख कोटी एएमए, 2020 मध्ये 1.73 लाख कोटी तर 2021 मध्ये सुमारे 1.59 लाख कोटी एएमए राहिला. 2020 मध्ये प्रेक्षकांच्या वाढलेल्या संख्येमागे लॉकडाउन कारणीभूत होते.