प्रतिनिधी /पर्वरी
पेन्ह द फ्रान्स पंचायतीचा काही भाग पणजी स्मार्ट सिटीत समाविष्ट करण्य़ाच्या अधिसूचनेवरून ग्रामस्थ आक्रमक बनले आहेत. या विषया संदर्भात पेन्ह द फ्ढ्रानस् पंचायतीने रविवार दि. 8 जानेवारी रोजी घेतलेली विशेष ग्रामसभा ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे बरीच गाजली.
पर्वरी मतदारसंघातील पेन्ह द फ्रान्स पंचायतीचा काही भाग स्मार्ट सिटी अंतर्गत पीडीएमध्ये आणून पणजी महापालिकेत समाविष्ट करणाऱया अधिसूचनेवर पंचायत मंडळ आणि मतदारसंघाचे आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी आक्षेप घेऊन शिष्टमंडळासह नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांची शुक्रवार दि. 6 रोजी भेट घेत आक्षेप नोंदवला व त्यासंबंधीचे निवेदन मंत्री राणे यांना सादर केले.
अधिसूचनेतून घरे वगळून सुधारित अधिसूचना काढणार असे तोंडी आश्वासन मंत्री राणे यांनी दिले होते, असे सरपंच स्वप्नील चोडणकर यांनी ग्रामसभेत सांगितले. त्यावर काही ग्रामस्थांनी आक्षेप घेत आम्हांला तोंडी आश्वासन नको काय ते लेखी द्या असा आग्रह धरला. तसा ठराव ग्रामसभेत घेण्याची मागणी केली.
सचिवालय, विधानसभा संकुल आणि उच्च न्यायालय हेच नियोजनासाठी उत्तर गोवा पीडीएत राहणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले होते. दरम्यान स्मार्ट सिटी विकास मंडळाकडून अमृत सिटी योजने अंतर्गत सांगोल्डा, साल्वादोर द-मुंद, पिळर्ण, पेन्ह द फ्रान्स, रेईस मागुश आणि सुकूरचा भाग ओडीपीमध्ये घालण्यात आला होता. त्या संबंधीचे पत्र पेन्ह द फ्रान्स पंचायतीला दि. 22 फेब्रुवारी 2022 चे पत्र दि. 21 डिसेंबर 2022 रोजी म्हणजे तब्बल अकरा महिन्याने मिळाले. याबद्दल पंचायतीतर्फे पंचायत मंडळाच्या बैठकीनंतर आक्षेप घेणारे पत्र दि. 3 जानेवारी 23 रोजी पाठविले आहे, असे सरपंच चोडणकर यांनी सांगितले.
यावेळी ग्रामस्थाच्या उपस्थितीत आक्षेपाचा ठराव घेण्यात आला. सरपंच चोडणकर यांनी ठराव मांडला आणि उपस्थित ग्रामस्थानी त्याला अनुमोदन दिले. यावेळी सरपंच चोडणकर सहित उपसरपंच दीपाली वेर्णेकर, इतर पंचायत सदस्य आणि सचिव सचिन नाईक उपस्थित होते.