वृत्तसंस्था/ साव पावलो
विक्रमी तीन विश्वचषक जिंकणाऱया ब्राझीलच्या संघाचे भाग राहिलेले आणि सर्वांत प्रमुख क्रीडा व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेले फुटबॉलचे राजा पेले यांचे गुरुवारी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. पेले 2021 पासून कोलन कर्करोगावर उपचार घेत होते. त्यांना गेल्या महिन्यापासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात असताना त्यांची प्रकृती बिघडली होती. त्या वैद्यकीय केंद्राने सांगितल्यानुसार, कर्करोगामुळे अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
त्यांची मुलगी केली नॅसिमेंटोने पेलेंचे निधन झाल्यानंतर इंस्टाग्रामवर लिहिले. ‘आम्ही तुमच्यावर अविरत प्रेम करतो. तुमच्या आत्म्याला शांती मिळो’. पेले यांचे एजंट, जो फ्रागा यांनीही त्यांच्या मृत्यूची पुष्टी करताना राजा निघून गेला आहे, अशी प्रतिक्रिया दिली. फुटबॉलच्या सर्वांत महान खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱया पेले यांनी जवळपास दोन दशके चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आणि ब्राझीलचा क्लब सांतोस तसेच ब्राझीलच्या राष्ट्रीय संघातून अनेक उच्चांक नोंदविताना गोलांचा वर्षाव पाडला. त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यांनी तीन विश्वचषक जिंकले. हे साध्य करणारे ते एकमेव खेळाडू आहेत.