वृत्तसंस्था/नवी दिल्ली
विद्यमान वित्तवर्षाच्या एप्रिल ते जून या प्रथम तिमाहीत भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा विकासदर 6.7 टक्के इतका राहिला आहे. तो अपेक्षेपेक्षा काहीसा कमी असला तरी जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा अधिक आहे. त्यामुळे जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ही ख्याती भारताने या तिमाहीतही राखली.
स्थूल मूल्यवर्धित विकासदराचे प्रमाण या तिमाहीत 6.8 टक्के इतके आहे. मागच्या तिमाहीत ते 6.3 टक्के होते. उत्पादन क्षेत्राचा विकासदर या तिमाहीत 7 टक्के राहिला. याच्या मागच्या तिमाहीपेक्षा तो 1.9 टक्क्यांनी कमी आहे. कृषी क्षेत्राचा विकासदर 2 टक्के असून तो गेल्या तिमाहीपेक्षा 0.9 टक्के वाढला आहे. व्यापार, हॉटेल्स, वाहतूक आणि दूरसंचार क्षेत्राचा विकासदर तुलनेते कमी म्हणजे 5.7 टक्के राहिला आहे. तो सर्वसाधारण विकासदरापेक्षा 1.9 टक्क्याने कमी आहे. मात्र, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राचा विकासदर 7.4 टक्के असून तो याच्या मागच्या तिमाहीच्या तुलनेत 3.4 टक्के वाढला असल्याची माहिती देण्यात आली.
पहिली तिमाही मंदगतीची
कोणत्याही नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा विकासदर मंदावलेला असतो. त्यामुळे विद्यमान आर्थिक वर्षासाठी यापुढच्या दोन तिमाही महत्वाच्या ठरणार आहेत. या तिमाहींमध्ये विकासदरात वाढ झाल्यास या वर्षाचा सरासरी विकासदर 7.2 टक्क्यांचे आपले निर्धारित लक्ष्य गाठू शकणार आहे.