बेळगाव प्रतिनिधी – दहावीत शिकणार्या पाचवा क्रॉस, शिवाजीनगर येथील विद्यार्थ्याचे अपहरण करुन त्याचा भीषण खून करण्यात आला आहे. गुरूवारी सकाळी मुचंडी (ता. बेळगाव) जवळील आमराईत त्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने सारे शहर हादरले आहे. शाळेत झालेल्या वादावादीनंतर हा प्रकार घडल्याचा संशय आहे. प्रज्वल शिवानंद करेगार (वय 16, रा. शिवाजीनगर-पाचवा क्रॉस) असे त्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. तो येथील जी.ए.हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होता. गुरूवारी सकाळी मुचंडी जवळील एका आमराईत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. कॅम्प पोलीस स्थानकात भा.दं.वि. 363 व 302 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गिरीश, मारिहाळचे पोलीस निरीक्षक महांतेश बस्सापूर, हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर , कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी आदी अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरूवातीला अनोळखीचा मृतदेह अशीच त्याची ओळख होती. घटनास्थळी आढळलेल्या शाळेच्या बेल्टमुळे तातडीने त्याची ओळख पटली.
प्रज्वलचे वडील शिवानंद करेगार यांनी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. नेहमी प्रमाणे बुधवारी सकाळी प्रज्वल शाळेला गेला होता. शाळा सुटल्यावर तो घरी परतला नाहि . प्रज्वलचा लहान भाऊहि जी. ए. हायस्कूलमध्येच शिकतो. प्रज्वल घरी पोहोचला नाहि म्हणून कुटुंबियांची चिंता वाढली. सुरूवातीला त्यांनी मार्केट पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर कॅम्प पोलीस स्थानकात जाऊन रात्री आपला मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती दिली.
कॅम्प पोलिसांनी बिनतारी यंत्रणेवरुन या संबंधीची माहिती देऊन शहरातील सर्व पोलीस स्थानकांना सतर्क केले. गुरूवारी सकाळी मुचंडी जवळील आमराईत अनोळखीचा मृतदेह आढळल्याची मारिहाळ पोलिसांना माहिती मिळाली. दुपारी मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. खून झालेला प्रज्वल हा दहावीचा विद्यार्थी होता हे समजताच तपास अधिकारीहि चक्रावले. कारण विद्यार्थ्याचा खून कोण व कशासाठी करणार? असा प्रश्न तपास अधिकार्यांना पडला.
प्रज्वलच्या अंगावरील कपडेहि नव्हते. केवळ अंडरवेअरवर मृतदेह आमराईत पडला होता. तीक्ष्ण हत्याराने भोसकून त्याचा खून करण्यात आला आहे. खुनानंतर दगडाने ठेचल्याचे दिसून आले आहे. पंचनाम्याचा सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी पुढील तपास करीत आहेत.
Trending
- बेनकनहळ्ळी महालक्ष्मीदेवीला ओटी भरण्यासाठी भाविकांची गर्दी
- हनुमान जयंतीनिमित्त अनगोळमध्ये विविध स्पर्धा
- साई फार्म स्पोर्ट्स, जेवर गॅलरीची विजयी सलामी
- कामेवाडी क्रिकेट स्पर्धेत कुद्रेमनी संघ विजेता
- विश्रुत चिट्स लिटल मास्टर्स लीग स्पर्धेचे शानदार उद्घाटन
- पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅलीला प्रतिसाद
- 14 मतदारसंघांत आज मतदान
- 89 मतदारसंघात आज मतदान