कन्नड चित्रपट अभिनेते चरणराज यांचे प्रतिपादन : डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कूलचा हीरकमहोत्सव
प्रतिनिधी /बेळगाव
विद्यार्थ्यांना चांगले जीवन जगायचे असेल आणि चांगले नागरिक बनायचे असेल तर शिक्षकांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. मुलांना बालवयातच दर्जेदार शिक्षण मिळाले तर ते चांगले नागरिक बनू शकतात. शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचे स्मरण कायम ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते, असे मत कन्नड चित्रपट अभिनेते चरणराज यांनी व्यक्त केले.
येथील भरतेश शिक्षण संस्थेच्या डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कूलच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, माझे शिक्षण भरतेशमध्ये पूर्ण झाले. शाळेतील शिक्षक व वर्गमित्रांना मी कधीही विसरू शकत नाही. आता ही शिक्षण संस्था प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करीत असून संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
भरतेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. जिनदत्त देसाई म्हणाले, भरतेश संस्थेची डी. वाय. चौगुले भरतेश हायस्कूल ही एक नामांकित शाळा आहे. शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज देशासह परदेशात उत्तुंग कामगिरी बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार
या कार्यक्रमात शैक्षणिक संस्थेचे संस्थापक आणि देणगीदार ऋषभ दो•ण्णावर, सुरेंद्र कोडचवाड, माजी अध्यक्ष गोपाळ जिनगौडा, पुष्पदंत दो•ण्णावर यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेत 1962 पासून कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर भरतेश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजीव दो•ण्णावर, सचिव श्रीपाल खेमलापुरे, कोषाध्यक्ष भूषण मिरजी, सहसचिव प्रकाश उपाध्ये, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य विनोद दो•ण्णावर, भरत पाटील, देवेंद्र देसाई, शरद पाटील, अशोक दानवडे, हिराचंद कलमनी, डॉ. सावित्री दो•ण्णावर, वसंत कोडचवाड उपस्थित होते.
प्राचार्य एस. एन. अक्की यांनी स्वागत, विजय हन्नीकेरी यांनी सूत्रसंचालन तर संजय बिर्जे यांनी आभार मानले. यावेळी माजी विद्यार्थी, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य व पालक उपस्थित होते. सचेत-परंपरा कार्यक्रम 31 जानेवारी रोजी
कार्यक्रमाच्या तारखेत बदल
भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या हीरक महोत्सवानिमित्त बॉलिवूडची लोकप्रिय गायक जोडी सचेत आणि परंपरा यांचा कार्यक्रम शुक्रवार दि. 20 जानेवारी रोजी किल्ल्याजवळील मैदानावर आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम कलाकारांच्या प्रवासातील काही आकस्मिक अडचणींमुळे आता मंगळवार दि. 31 जानेवारी रोजी होणार आहे. हा कार्यक्रम त्याच जागी आणि त्याच वेळी होईल तसेच 20 तारखेची प्रवेशिका 31 तारखेला वापरता येणार असल्याचे भरतेशच्या व्यवस्थापन मंडळाने कळविले आहे.
प्रकाश हुक्केरी यांच्याकडून भरतेश शिक्षण संस्थेला अनुदान मंजूर


विधानपरिषदेचे सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी मलेनाडू विकास प्राधिकार निधीतून 24 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान भरतेश शिक्षण संस्थेला मंजूर केले. बुधवारी आमदार हुक्केरी यांचे खासगी सचिव गोपी कागवाड व शिवकुमार यांनी अनुदान मंजूर पत्र भरतेश संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे दिले. उपाध्यक्ष राजीव दो•ण्णावर, सचिव श्रीपाल खेमलापुरे यांच्याकडे अनुदान मंजूर पत्र देण्यात आले.
यावेळी संचालक विनोद दो•ण्णावर, शरद पाटील, भूषण मिरजी, हिराचंद कलमनी, शाळेचे मुख्याध्यापक बी. एम. लक्कनगौडा यासह इतर उपस्थित होते.
भक्तिगीतांचा गोडवा नव्या अंदाजात


भरतेश शिक्षण संस्थेच्या हीरक महोत्सवानिमित्त गायिका अपर्णा भट यांनी उपस्थितांची मने जिंकली
अनेक वर्षांपूर्वीच्या भक्तिगीतांचा गोडवा आजही कमी झालेला नाही. आजच्या डीजेच्या काळातही भक्तिगीतांची आवड कमी झालेली नाही. आजच्या मॉडर्न युगात भक्ती संगीत व भावगीते वेगळ्या अंदाजामध्ये सादर केली जाऊ शकतात हे गायिका अपर्णा भट यांनी दाखवून दिले. त्यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी बेळगावकर रसिकांची मने जिंकली.
भरतेश शिक्षण संस्थेच्या हीरक महोत्सवानिमित्त बुधवारी अपर्णा भट यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मूळच्या मुंबई येथील अपर्णा भट या श्री श्री रविशंकर यांच्या भक्त आहेत. त्यांच्या सानिध्यात त्यांनी आपल्या संगीत क्षेत्राला सुरुवात केली. पेशाने फॅशन डिझायनर असतानाही एक आवड म्हणून त्या भक्तिगीतांचा कार्यक्रम करतात. त्यांना साथ लाभली ती तुषार भुटा यांची. तुषार यांनी आपल्या पहाडी आवाजातून अनेक भावगीते सादर केली. त्यांना निपूण, भूषण व विमल यांची संगीत साथ मिळाली.
‘अच्युतम केशवम’ गाण्याला मिळाली दाद
अपर्णा भट यांनी महावीरांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर हे शिव नमो, नम: शिवाय, मोरया, हरहर शंभो अशी भक्तिगीते सादर केली. गणपती, कृष्ण, शिव शंकर यावर आधारित भक्तिगीतांचा सुरेल नजराणा त्यांनी सादर केला. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम हे अनोख्या अंदाजाने गाणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रारंभी भरतेश शिक्षण संस्थेच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष संजय पाटील, भाजप प्रवक्ते एम. बी. जिरली यांचा संस्थेचे उपाध्यक्ष राजीव दो•ण्णावर, सचिव श्रीपाल खेमलापुरे, खजिनदार भूषण मिरजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित कलाकारांचाही सत्कार झाला. स्वाती जोग यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.