विसर्जनानंतर काही तासात कृष्णेचे वाळवंट, घाट चकाचक
प्रतिनिधी/ कराड
अनंत चतुर्दशीला हजारो मूर्तींचे विसर्जन येथील कृष्णा घाटावर झाले. दिवसभरात कृष्णा नदीच्या वाळवंटात निर्माल्य, प्लास्टीक कचरा वाढला होता. मात्र पालिकेचा आरोग्य विभाग दिवसभर तैनात असताना मध्यरात्रीही निर्माल्य, कचरा उचलण्याचे काम आरोग्य कर्मचारी न थकता करताना दिसत होते. तर विसर्जनाच्या दुसऱया दिवशी पहाटेच वाळवंटात स्वच्छतेचे काम सुरू करून सकाळी 9.30 पर्यंत वाळवंट आणि घाट परिसर चकाचक करण्यात आला.
कराड पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी विसर्जनादिवशी ऑन डय़ुटी होते. दिवसभर शहरात नेमून दिलेल्या ठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जनासाठी आवाहन करताना दिसत होते. मुख्याधिकारी रमाकांत डाके, ए. आर. पवार, रफीक भालदार, मिलिंद शिंदे यांच्यासह पालिकेचे अधिकारी व आरोग्य कर्मचारी कृष्णा पात्राजवळ दिवसभर ठाण मांडून होते. येथे असणाऱया आरोग्य कर्मचाऱयांना स्वच्छतेची कामे नेमून दिलेली होती. ती दिवसभर सुरू असताना मध्यरात्रीही कर्मचारी रस्त्यावर पडलेले निर्माल्य आणि कचरा उचलत होते. वाळवंटात निर्माल्य आणि कचरा वाढलेला होता. विसर्जन मिरवणूक रात्री अडीचच्या सुमारास संपली. त्यानंतर पहाटे सहापासून वाळवंटात स्वच्छतेचे काम सुरू झाले. सकाळी 9.30 पर्यंत वाळवंटातील निर्माल्य, कचरा उचलून घेत वाळवंट आणि कृष्णा घाट चकाचक करण्यात आला. सकाळी घाटावर आलेल्या नागरिकांना वाळवंट स्वच्छ दिसू लागल्याने त्यांनी आरोग्य विभागाचे कौतुक केले.