Tarun Bharat

‘धरोहर’ ठरणार पर्यटन आकर्षण

चारशे वर्षे जुन्या वारसा इमारतीत संग्रहालय

प्रतिनिधी/ पणजी

भारताच्या पर्यटन नकाशात आणि गोव्यात येणाऱया पर्यटकांसाठी ‘मस्ट सी’ असे आकर्षण ठरणाऱया ‘धरोहर’ या राष्ट्रीय सीमाशुल्क आणि जीएसटी संग्रहालयाचे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याहस्ते शनिवारी पणजीत राष्ट्रार्पण करण्यात आले.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी तसेच गोव्याचे पंचायतराज मंत्री माविन गुदिन्हो यांची त्यावेळी उपस्थिती होती. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून अर्थमंत्रालयातर्फे 6 ते 12 जून दरम्यान ‘अनोखा सप्ताह’ साजरा करण्यात आला. त्याचाच भाग म्हणून हा संग्रहालय राष्ट्रार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

पणजी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मांडवी नदीच्या किनारी असलेल्या सुमारे 400 वर्षे जुन्या पोर्तुगीजकालीन निळ्या इमारतीत हे संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे. तेथील एकाच दगडातून बनवण्यात आलेल्या शिल्पकृतीवरील सोनेरी वाळू बाजूला सरकावून अर्थमंत्र्यांनी अत्यंत अनोख्या पद्धतीने संग्रहालयाचे उद्घाटन केले.

मीठावरील करापासून जीएसटीपर्यंतचा प्रवास

देशातील एक वैशिष्टय़पूर्ण वस्तू संग्रहालय ठरलेल्या ‘धरोहर’ मध्ये भारतीय सीमाशुल्क विभागाने तस्कर तसेच चोरांकडून जप्त केलेल्या देशातील प्राचीन मूर्ती आणि अन्य स्थापत्य वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय देशाचा वारसा, सौंदर्य आणि समाजाचे रक्षण करताना विभागाने केलेल्या कारवायांची माहितीही इथे पाहता येणार आहे. अशाप्रकारचे हे देशातील पहिलेच संग्रहालय आहे. ‘धरोहर’ मध्ये एकूण आठ प्रेक्षक गॅलरी असून त्यात भारतीय अप्रत्यक्ष कराचा मीठावरील करापासून जीएसटीपर्यंतचा प्रवास सांगणाऱया गॅलरींचा समावेश आहे.

त्याशिवाय सीमाशुल्क अधिकाऱयांनी जप्त केलेली प्राचीन नाणी, मूर्ती, धोकादायक स्थितीतील दुर्मिळ प्राणी, हत्यारे आणि अमलीपदार्थ अशा सगळय़ा वस्तूंचा समावेश असेल.

यातील सर्वात वैशिष्टय़पूर्ण वस्तू म्हणजे ‘ऐन-ए-अकबरी’ या अकबरकालीन दस्तऐवजाचे दुर्मिळ मूळ हस्तलिखित येथे प्रदर्शित करण्यात आले आहे. सीमाशुल्क विभागाने भारत-नेपाळ सीमेवर रक्सौल येथून ते हस्तगत केले होते. त्याशिवाय  कुरूक्षेत्रावरील अमीन पिलर्सची प्रतिकृती, मध्ययुगीन काळातील खगोलशास्त्रीय उपकरणे, धातू आणि दगडांची जप्त केलेली दुर्मिळ शिल्पे, हस्तिदंती वस्तू आणि वन्यजीव संबंधित वस्तूंचा समावेश आहे.

देशात वर्ष 2000 पासून वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) नवी संकल्पना पुढे आली. त्याचा गत 20 वर्षांतील प्रवासाचा आढावा घेणारी ’जीएसटी गॅलरी’ ही नवीन जोड ‘धरोहर’ संग्रहालयास देण्यात आली आहे. संग्रहालयाच्या ‘ई-कॅटलॉगमध्ये विविध गॅलरीजचे अत्युत्तम दर्जा असलेले फोटो त्यांच्या माहितीसह ठेवण्यात आले आहेत. यातून येथे येणाऱया पर्यटकांना सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळू शकेल, तसेच पुरातत्व आणि प्राचीन इतिहास अभ्यासकांसाठी देखील हे संग्रहालय म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे.

Related Stories

श्रावणात जाईचा सुगंध दरवळलाच नाही…

Patil_p

बजेटमधील शॉर्ट सर्किटने वीजधारीत वाहन सबसिडी योजना मागे घेणे भाग पडले

Amit Kulkarni

पोट विकारांसाठी वक्रासन, पवनमुक्तासन

Amit Kulkarni

भोम पंचायतीतर्फे बेकायदेशीर भंगारअड्डय़ावर कारवाई

Patil_p

मोहन कदम यांच्या ‘माझी कविता’चे प्रकाशन

Amit Kulkarni

पंतप्रधानांच्या हस्ते होणार दोन प्रकल्पांचे उद्घाटन

Amit Kulkarni
error: Content is protected !!