देशभरातील वीजपुरवठ ठप्प ः अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये आणीबाणी
वृत्तसंस्था/ हवाना
कॅरेबियन समुद्रात निर्माण झालेल्या वादळाने क्यूबामध्ये मोठे नुकसान घडवून आणले आहे. इयान नावाच्या या वादळामुळे क्यूबामध्ये पॉवर ब्लॅकआउट झाला आहे. 27 सप्टेंबर रोजी क्यूबाच्या पश्चिम किनाऱयावर या वादळाने धडक दिली आहे. हे वादळ आता अमेरिकेतील फ्लोरिडाच्या दिशेने वाटचाल करत आहे. फ्लोरिडामध्ये सुमारे 25 लाख लोकांना घर रिकामी करण्यास सांगण्यात आले आहे. हे वादळ 1921 मध्ये धडकलेल्या टारपोन स्प्रिंग्स वादळापेक्षाही अधिक नुकसान घडवून आणू शकते असे सांगण्यात येत आहे.
क्यूबामध्ये इयान वादळामुळे 195 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहिले आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले असून शेतातील पिकांची हानी झाली आहे. तर पॉवरग्रिडला फटका बसल्याने पूर्ण देश अंधारात बुडाला आहे. आर्थिक संकटाला तोंड देणारा क्यूबा इयान वादळामुळे अधिकच कोलमडून पडला आहे. इयान वादळामुळे क्यूबामधील पिनार डेल रियो प्रांताचे प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रांतात सिगारसाठी वापरण्यात येणाऱया तंबाखूचे पिक घेण्यात येते. इयान वादळामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत.
इयान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या प्रशासनाने फ्लोरिडामध्ये आठवडय़ाभरासाठी आणीबाणी घोषित केली आहे. या वादळाचा सर्वाधिक प्रभाव फ्लोरिडाची राजधानी टॅम्पा आणि सेंट पीटर्सबर्ग शहरामध्ये दिसून येणार आहे.
फिलिपाईन्समध्ये मोठे नुकसान
फिलिपाईन्समध्ये सोमवारी नोरू वादळाने मोठे नुकसान केले आहे. वादळामुळे देशात किमान 8 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर सरकारने लोकांना समुद्रकिनाऱयावर न जाण्याचा निर्देश दिला आहे.