पश्चिम बंगालमधील नादिया जिल्हय़ातील रहिवासी 25 वर्षांच्या पियाशा महलदार यांची उंची अवघी तीन फूट आहे. मात्र, या विपरित परिस्थितीशी झुंज देत त्यांनी अनेक महत्त्वाच्या उपलब्धी प्राप्त केल्या आहेत. जन्मापासूनच त्यांना फोकोमेलिया हा विकार असल्याने त्यांची उंची वाढली नाही. तसेच शारीरिक विकृतींनीही त्यांना ग्रासले. हा एक दुर्मीळ प्रकृती दोष आहे. ज्यामुळे हात आणि पाय यांच्या हाडांची वाढ खुंटते. त्यामुळे उंची वाढत नाही. तथापि, महलदार यांच्या उंचीची उणीव त्यांच्या बुद्धीने त्यांनी प्रयत्नपूर्वक भरून काढली आहे. त्यांनी नुकतीच युजीसीची नेट परीक्षा दिली असून त्यात त्यांना 99.31 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तसेच ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी त्या पात्र ठरल्या आहेत. परमेश्वराच्या कृपेमुळेच आपण शारीरिक व्यंग असूनही बुद्धिची भरारी घेऊ शकलो, असे त्या म्हणतात. आता त्यांनी पीएचडीची तयारी सुरू केली आहे.
त्यांच्या आई सुप्रिया यांनाही कन्येचा रास्त अभिमान आहे. उंची वाढत नसल्याने मुलीचे आयुष्यात कसे होणार, या चिंतेने त्यांना सुरुवातीला ग्रासले होते. तथापि, मुलीची बौद्धिक प्रगती पाहून त्यांचे नैराश्य दूर झाले होते. आपल्या कमी उंचीचा त्यांनी कधीही बाऊ केला नाही. तसेच इतरांच्या मिसळताना आपल्यामध्ये काही कमतरता आहे, याची नको इतकी जाणीव ठेवली नाही. परिणामी त्यांचा बौद्धिक विकास नैसर्गिकरीत्या झाला आणि आपल्या वैगुण्यावर मात करत त्यांनी मोठी बौद्धिक उंची गाठली. याबद्दल त्यांचा मित्रपरिवारही समाधानी आहे.