सेन्सेक्समध्ये 465 अंकांची वाढ ः महिंद्रा, ऍक्सिस बँक नफ्यात
प्रतिनिधी/ मुंबई
जागतिक बाजारात मिळत्याजुळत्या कलामुळे भारतीय शेअर बाजार सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी चांगली तेजी दर्शवत बंद झाला आहे. बँका आणि वित्त संस्थांच्या समभागात खरेदी दिसली.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 465 अंकांच्या तेजीसह 58,853.07 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 127 अंकांच्या वाढीसह 17,525.10 अंकांवर बंद झाला होता. ऑटो निर्देशांक व धातू निर्देशांक 1 टक्के इतका मजबुत होत बंद झाला. एफएमसीजी व फार्मा निर्देशांक तेजीसोबत बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 19 समभाग तेजीसह बंद झाले होते. महिंद्रा आणि महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग वधारासह बंद झाले.
भारतीय शेअर बाजाराची सोमवारी आठवडय़ाची सुरूवात काहीशी नरमाईने झाली. सेन्सेक्स निर्देशांक सकाळी 87 अंकांच्या घसरणीसह 58,300 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 32 अंकांच्या घटीसह 17,365 अंकांवर खुला झाला. पण नंतर मात्र दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स व मारुती सुझुकी यांच्यामुळे बाजाराला बऱयापैकी तेजीकडे वळणे शक्य झाले. खासगी बँक आणि धातू क्षेत्राच्या निर्देशांकांनी चांगली साथ बाजाराला दिली. पण सार्वजनिक बँक व आयटी निर्देशांक काहीसा दबाव झेलताना दिसला. स्टेट बँकेचा समभाग 3 टक्के घसरत 514 रुपयांवर आला होता. जागतिक बाजारांमध्ये अमेरिकेतील बाजार घसरणीसह व्यवहार करत होते तर युरोपियन बाजार मात्र तेजीत होते. आशियाई बाजारात निक्की, कोस्पी, शांघाई कम्पोझीट यांचे निर्देशांक तेजीसह व्यवहार करत होते.
शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 89 अंकांनी वधारुन तो 58,387.93 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 15 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,397.50 वर बंद झाला होता. दुसरीकडे बाजारात नायकाचे समभाग सोमवारी 4 टक्के चढत 1473 रुपयांवर पोहचले होते.