नितीन गडकरी यांच्याहस्ते होणार झुआरी पुलाचे लोकार्पण : बिटूमेन तंत्रज्ञानाचा वापर, संपूर्ण 2500 कोटी केंद्राकडून खर्च
प्रतिनिधी /पणजी
अभियांत्रिकी कौशल्याचा आविष्कार ठरावा अशाप्रकारे झुआरी नदीवर उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या एका भागाचे लोकार्पण आज दि. 29 जानेवारी रोजी होत आहे. केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते सायंकाळी 7 वाजता हा लोकार्पण सोहळा होणार आहे.
सुमारे 2500 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या या पुलासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून मध्यंतरी आलेल्या कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षे त्याच्या पूर्णत्वास येण्यात उशीर झाला. सध्या त्यातील चार लेनच्या एका भागाचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचेच आज लोकार्पण होत आहे.
बिटूमेन तंत्रज्ञानाचा वापर
अटल सेतू आणि नवीन झुआरी पूल यांच्या बांधकाम तंत्रज्ञानात मोठा फरक आहे. अटल सेतूवर डॅक स्लॅब वॉटर प्रुफिंगसाठी एक विशेष प्रकारचा मेंब्रेन वापरण्यात आला होता. परंतु त्याची जोडणी योग्य प्रकारे न झाल्यामुळे तो प्रयोग फसला, परिणामी तेथील डांबरीकरण पूर्णतः उखडून गेले. त्यामुळे सध्या ते काढून टाकण्यात येत आहे. मात्र झुआरी पुलावर असा कोणताही प्रकार होणार नाही. कारण तेथे बिटूमेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून स्लॅबचे काँक्रिटच एवढे जाड थराचे टाकण्यात आले आहे की त्यासाठी विशेष वॉटर प्रुफिंगची आवश्यकता भासणार नाही.
संपूर्ण 2500 कोटी केंद्राकडून खर्च
2500 कोटी खर्चाच्या झुआरी पुलासाठी एकुण तीन टप्प्यांमध्ये अनुक्रमे 820 कोटी, 936 कोटी आणि 774 कोटी असा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यातील एका भागाचे बांधकाम पूर्ण झाले असून दि. 30 डिसेंबरपासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. सध्या या पुलावरून मडगावमार्गे पणजीत येण्यासाठी दोन लेनचा वापर करण्यात येणार आहे. त्या दोन्ही लेन सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुल्या ठेवण्यात येतील. पणजीहून मडगावला जाण्यासाठी तिसऱया लेनचा वापर करता येणार आहे. त्या लेनवरून केवळ अवजड वाहनांना जाता येणार आहे.
पुलाचा दुसरा भाग पूर्ण होईपर्यंत ही व्यवस्था असेल व अवजड वाहने वगळता अन्य सर्व वाहतूक विद्यमान जुन्या पुलावरून करण्यात येणार आहे. त्यामागील कारण म्हणजे सदर पूल थेट वेणापर्यंत जात असल्याने कुठ्ठाळी, वास्को या ठिकाणी जाणाऱया वाहनांची अडचण होणार आहे. त्यांना वेर्णावरून पुन्हा तीन किमी अंतर पार करून परत यावे लागणार असल्याने त्यांच्यासाठी तो द्राविडी प्राणायम ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती साबांखातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.
दरम्यान, आज होणाऱया पुलाच्या लोकार्पण सोहळ्यास केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमवेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, साबांखामंत्री नीलेश काब्राल आणि मंत्रीमंडळातील अन्य सदस्य, आमदार, भाजप पदाधिकारी, साबांखातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यासाठी पुलाच्या मध्यभागी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे एका दमदार सोहळ्याचे साक्षिदार होण्याची संधी तमाम गोमंतकीयांना मिळणार आहे.