कुंकळये म्हार्दोळ येथे सापडलेली दुचाकी कुंडईत, याप्रकरणी तक्रार नाहीच… : गस्तीवरील फोंडा पोलिसांच्या वाहनांचे मिटर तपासणार
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा तालुक्यात झालेल्या धाडसी चोरीसत्राला पाच दिवस उलटल्यानंतरही फोंडा पोलिसांकडून तपास संथगतीने सुरू आहे. कुंकळये-म्हादोंळ येथे सापडलेल्या दुचाक्याबाबत गांभीर्याने तपासकाम करण्याऐवजी दुचाकी कुंडई येथे ठेवण्यापुरते सोपस्कर पुर्ण करण्यात आलेले आहे. प्रियोळ मतदारसंघात वाढत्या चोरीसत्राची गंभीर दखल घेत मंत्री गोविंद गावडे यांनी कडक भूमिका घेत गस्तीवरील पोलिसांच्या वाहनांचे मिटर तपासण्यात येईल असा ईशारा दिला आहे.
फोंडय़ात बुधवार 17 ऑगस्ट दुपारी ते 18 ऑगस्ट गुरूवारी सायंकाळपर्यत गस्तीवरील पोलिसांना गुंगारा देत ‘राऊंड द क्लॉक’ खांडोळा-माशेल, मागीलवाडा-प्रियोळ, कुंकळये, पालसरे, कोपरवाडा कुर्टी, तिस्क उसगांव भागात चारेटय़ानी धुमाकूळ घातला. सुमारे सहा विविध ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यात उशिरा रात्री अडीच तीनच्या दरम्यान खांडोळा-माशेल व तिस्क उसगांव येथे चोरटयांनी धाडसी चोरी केल्या. चोरटयांनी सुमारे 28 लाखांची रोकड लांबविली होती. घटनास्थळाच्या सुमारे 500 मिटर अंतरावर आढळलेल्या दोन मशिनपैकी एक एटीएम मशिन तोडण्यात चोरटे अपयशी ठरले होते. दुसऱया एटीएमधून सुमारे 13 लाखाची रोकड चोरटय़ानी लांबवून धूम ठोकली होती. खांडोळा माशेल येथील श्री महागणपती मंदिरातील सुमारे दहा लाखांचा ऐवज लांबविला तसेच दिवसाढवळया सुमारे रू लाखांच्या किमतीच्या सोनसाखळी व मंगळसुत्रे हिसकावून महिला व एका युवतीला जखमी केले होते. याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर अधिक तपास करीत आहे.
चोरी प्रकरणी फोंडा पोलिसांचा तपास संथगतीने
फोंडा पोलिसांना जेरीस आणलेल्या धाडसी चोरीसत्रात केवळ कुंकळये येथे सापडलेल्या दुचाक्या महत्चाचे धोगेदोरे ठरू शकतात? त्यापैकी रस्त्यावर आढळलेली जीए 03 जे 7841 दुचाकीच्या यादिशेने मात्र पोलिसांनी तपास करण्याचे धाडस अद्याप दाखविलेले नाही. तसेच त्याच रात्री कुंकळय़े येथील एका देवस्थानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अज्ञात व्यक्ती लंगडलेल्या अवस्थेत चालत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तरीही फोंडा पोलीस याप्रकरणी कोणतेच स्वायस्य दाखवित नसल्यामुळे कुंकळय़े येथील एका सुज्ञ नागरिकांने उपअधिक्षकाला निवेदनही सादर केले आहे. कुंकळय़े-म्हार्दोळ भागात बिगरगोमंतकीय मोठया प्रमाणात भाडय़ाच्या खोलीत वास्तव्यास असून त्याचीही चौकशी होणे गरजेची आहे.
गस्तीवरील पोलीस वाहनाचे मिटर तपासणार -मंत्री गोविंद गावडे
दरम्यान प्रियोळचे आमदार तथा क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी वाढत्या चोरीप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. प्रियोळ भागात दिवसाढवळया सोनसाखळय़ा हिसकावून महिला, युवतीना जखमी केलेले आहे. मागील काही दिवसापुर्वी ओमनी कारचे सायलेन्सर लांबविणारी सक्रीय झाली होती. भुरटय़ा चोरटयाच्या मुसक्या आवळण्यात फोंडा पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. फोंडा पोलीस स्थानकात कर्मचाऱयाचा तुटवडा नसून यापुढे रात्री गस्तीवरील पोलिस कुठे तैनात असतात किंवा वाहने ग्रामिण भागात किती फेऱया मारतात यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस वाहनांचे मिटरचा हिशोब तपासण्यात येईल असा ईशारा मंत्री गोविंद गावडे यांनी दिला.