प्रतिनिधी /बेळगाव
सध्या दसऱयाची सुटी असल्यामुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी पतंग उडविण्याचा आनंद घेत आहेत. परंतु हा आनंद पक्ष्यांच्या जिवावर बेतत आहे. पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱया मांजामुळे अनेक पक्षी जखमी होत आहेत. मागील चार दिवसांत सात ते आठ घुबड, घारी व इतर पक्ष्यांना जीवदान देण्यात आले. परंतु इतर अनेक पक्षी उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडले. त्यामुळे पतंग उडविण्यासाठी मांजाचा वापर करताना विचार करावा लागणार आहे.
दोऱयाला काचेची पावडर लावून मांजा तयार केला जातो. बंदी असतानाही शहर तसेच उपनगरांमध्ये राजरोसपणे मांजाची विक्री केली जात आहे. यामुळे अपघात घडून माणसांनाही दुखापती होत आहेत. प्रतिस्पर्ध्याचा पतंग कापण्यासाठी मांजाचा वापर केला जातो. यामुळे साध्या मांजासोबतच चायनिज मांजाचा वापर सर्रास केला जात आहे. त्यामुळे या मांजाची विक्री करणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तुटलेला मांजा एखाद्या झाडावर अडकतो. काहीवेळा उडताना पक्ष्यांच्या पायामध्ये अथवा अंगावर तो गुंडाळला जातो. यामधून बाहेर पडताना पक्ष्यांच्या पंखांना तसेच पायांना इजा होते. यामुळे पक्षी दगावण्याचे प्रमाण वाढले आहेत. मागील 8 दिवसांत बेळगाव शहरात अनेक पक्ष्यांवर उपचार करून त्यांना जीवदान देण्यात आले आहे.
जखमी घारीवर उपचार
सोमवारी विष्णू गल्ली वडगाव येथे जखमी अवस्थेतील एक घार नागरिकांना सापडली. मांजामुळे घारीच्या पंखांना इजा झाली होती. स्थानिक रहिवासी रघू कंग्राळकर यांनी त्या घारीवर उपचार करून सुखरुप सोडले. अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असून मांजा विक्री करणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.