Tarun Bharat

स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद

अवघ्या काही वर्षांपूर्वी तिच्यावर भीक मागण्याची वेळ आली होती. ती जखमी अवस्थेत होती. जगण्यासाठी कोणासमोरही जाऊन उभे राहणे आणि तो देईल ते खाद्यपदार्थ तोंडात ढकलून आला दिवस घालवणे एवढेच तिच्या हातात होते. लक्ष्मी असे तिचे नाव. ती बोलूही शकत नव्हती आणि स्वतःची व्यथाही मांडू शकत नव्हती. मात्र, अखेरीस तिला तिच्या या लाचार आणि हलाखीच्या जीवनातून मुक्तता मिळाली आहे. आता ती स्वातंत्र्याचा आनंद घेत आहे. तिच्या अन्नाची आणि औषधोपचारांची सुनिश्चित व्यवस्था झाली आहे. त्यामुळे हालअपेष्टातून तिची सुटका झाली आहे. हा स्वातंत्र्याचा आनंद तिच्या देहबोलीतून सर्वांना पहावयास मिळत आहे.

ही कथा कोणा असाहाय्य महिलेची नव्हे तर एका हत्तिणीची आहे. तिच्या मालकाने काही वर्षांपूर्वी तिला सोडून दिले. मालकाकडे असताना ती लोकांना पाठीवर बसवून सैर घडवून आणत होती. त्यातून तिच्या मालकाला काही पैसे मिळत होते. या पैशातून मालक, त्याचे कुटुंब आणि तिचीही गुजराण होत होती. पण नंतरच्या काळात मालकाने दुसरा व्यवसाय सुरू केल्यानंतर ती बेकार झाली. तिच्या खाण्याची जबाबदारीही मालकाने घेतली नाही. त्यामुळे तिच्यावर दारोदार भटकण्याची वेळ आली. हत्तीबद्दल नेहमीच लोकांना आकर्षण आणि प्रेमही असते. त्यामुळे परिसरातील लोकांनी थोडेफार खावयास देऊन तिला जिवंत ठेवले. पण अंगावर झालेल्या जखमा, वाढते वय यामुळे तिला उपचारांची आवश्यकता होती. ते मात्र कोणाकडून तिला मिळत नव्हते. पण तिच्या सुदैवाने नोयडा येथे सरकार आणि काही पशुप्रेमी सामाजिक संस्थांनी अनाथ हत्तींवर उपचार करण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी रुग्णालय आणि वसतीस्थान सुरू केले. काही दयाळू वृत्तीच्या लोकांनी तिला तिथे जागा मिळवून दिली. आता तिच्या खाण्यापिण्याच्या आणि औषधोपचारांच्या आवश्यकता सन्माननीय पद्धतीने पूर्ण केल्या जात आहेत. ती प्राणी असल्यामुळे तिच्या यापेक्षा अधिक अपेक्षा नाहीत. ती तिच्या स्वातंत्र्याचा आनंद नेहमी साजरा करत असते आणि तो तिच्या देहबोलीतून स्पष्टपणे दिसून येतो. ते पाहण्यासाठी अनेक लोक येतात. तिच्याप्रमाणेच या केंद्रात आणखीही काही मालकांनी सोडून दिलेले हत्ती आहेत. त्यांच्यासमवेत तिचे आयुष्य आनंदाने व्यतित होत असून लोकही या केंद्राला सढळ हस्ते अर्थसाहाय्य करीत आहेत.

Related Stories

भारत-चीन सैन्यांत पुन्हा झटापट

datta jadhav

केंद्रीय स्तरावर कोरोना लसीची खरेदी

datta jadhav

वीरेंद्र सिंग यांचा राजीनामा मंजूर

Patil_p

भारतात मागील 24 तासात 63,489 नवे कोरोना रुग्ण; 944 मृत्यू

datta jadhav

केरळात दैनंदिन रुग्णसंख्या वाढलेलीच!

Patil_p

रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंट्सची वाढ; EMI वाढणार

datta jadhav