आमदार विजय सरदेसाई यांचे मत : नव्या जेटी धोरणाला आक्षेप घेणारे निवेदन सादर
प्रतिनिधी /मडगाव
राज्यातील जेटी आणि होडय़ांची वाहतूक बंदर कप्तान खात्याच्याच अखत्यारित असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट मत गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त करताना गोवा सरकारच्या नव्या जेटी धोरणाला आक्षेप घेणारे आपले सविस्तर निवेदन सादर केले आहे.
गोवा सरकारच्या जेटी धोरणाला विरोध करताना सरदेसाई यांनी या धोरणात कुठल्याही रोजगाराच्या संधी नाहीत याकडे लक्ष वेधले आहे. हे धोरण गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून तयार केलें गेले आहे याकडे लक्ष वेधताना त्यांनी म्हटले आहे की, धोरणे तयार करणे हे महामंडळाचे काम नाही. पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करणे आणि राज्यातील पर्यटनाचा प्रसार करणे ही या महामंडळाची मुख्य कामे आहेत.
या धोरणात स्थानिकांना रोजगार देण्याची कोणतीही तरतूद नाही. उलट हे धोरण म्हणजे काही खासगी कंपन्यांना गोव्याची किनारपट्टी आंदण देण्याचा प्रकार वाटतो, असा आरोप त्यांनी केला आहे. सरकारला जर स्थानिकांच्या रोजगाराचे खरेच पडून गेलेले आहे, तर या धोरणात स्थानिकांना 80 टक्के रोजगाराच्या संधी ही अट समाविष्ट करावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे. जेटी व्यवस्थापन समितीची या धोरणात जी तरतूद करण्यात आली आहे त्यालाही सरदेसाई यांनी आक्षेप घेताना जेटीचे व्यवस्थापन बंदर कप्तान खात्याकडेच असण्याची गरज व्यक्त केली आहे.