ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाविषयी उलट-सुलट बोललं जात आहे. अनेकांनी या चित्रपटाला विरोध तर पंतप्रधान मोदींनी स्वतः या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. मात्र भाजपच्या सहयोगी असणाऱ्या एका पक्षाच्या नेत्याने या चित्रपटावर आणि टीमवर गंभीर आरोप केले आहेत.
दरम्यान, ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यावरून वाद निर्माण झाला आहे. चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांना १९९० साली सहन कराव्या लागलेल्या यातनांना वाचा फोडण्यात आली आहे. मात्र, त्यावरून आता पुन्हा देशात धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचं चित्र उभं राहिलं आहे. त्यामुळे चित्रपटाला काही भागात विरोध देखील होत असला, तरी केंद्रातील सत्ताधारी भाजपाकडून चित्रपटाचं जोरदार समर्थन केलं जात आहे. तर केंद्रात भाजपासोबत सत्तेत असलेल्या एका मित्रपक्षाकडून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. तसेच, ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाशी संबंधित सर्वांची चौकशी करण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे. जितन राम मांझी यांनी ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या टीमचे दहशतवाद्यांशी कनेक्शन असल्याचा दावा केला आहे.

