वाराणसी जिल्हा न्यायालयाचा आदेश : भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचा अहवाल
वृत्तसंस्था/ वाराणसी
ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाच्या अहवालासंबंधी वाराणसी जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने बुधवारी निर्णय दिला आहे. न्यायाधीशांनी सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक करण्याचा आदेश दिला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने यापूर्वीच हा अहवाल न्यायालयासमोर सादर केला होता.
न्यायालयाने बुधवारी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले तसेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अहवालाची प्रत दोन्ही बाजूच्या पक्षकारांना देण्यावर सहमती झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने ईमेलच्या माध्यमातून अहवाल देण्यावर आक्षेप दर्शविला होता, यामुळे दोन्ही बाजूंना अहवालाची प्रत पुरविण्यात येणार असल्याची माहिती हिंदू पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णु शंकर जैन यांनी दिली आहे.
मां श्रृंगार गौरी प्रकरणाच्या याचिकाककर्त्या सीता साहू, रेखा पाठक, मंजू व्यास आणि लक्ष्मी देवी यांच्याकडून सर्वेक्षण अहवालाची प्रत देण्यात यावी अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली होती. हा जनहिताचा मुद्दा असून याला गोपनीय स्वरुप देणे चुकीचे आहे. न्यायालयात सादर अहवालाचे अध्ययन करण्याचा अधिकार पक्षकाराला असल्याचे याचिकाकर्त्या महिलांचे म्हणणे होते.
सर्वेक्षण अहवाल याचिकाकर्त्या महिलांना पुरविण्यात आल्यास आम्हालाही उपलब्ध करविण्यात यावा अशी भूमिका अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीने मांडली. प्राचीन मूर्ती स्वयंभू ज्योतिर्लिंग भगवान विश्वेश्वरनाथच्या खटल्याप्रकरणी ज्ञानवापी सर्वेक्षण अहवालाची प्रत जोपर्यंत आम्ही सादर करत नाही तोवर तो सार्वजनिक केला जाऊ नये असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडून म्हटले गेले होते.