वृत्तसंस्था/ लंडन
यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरी आणि निर्णायक कसोटी गुरुवार 8 सप्टेंबरपासून ओव्हल मैदानावर सुरू होणार आहे. या मालिकेत या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकून बरोबरी साधल्याने ही शेवटची कसोटी अधिक रंगतदार होईल. या शेवटच्या कसोटीत पहिल्या डावात धावांची आघाडी घेणाऱया संघाला मालिका विजयाची शक्यता अधिक राहिल. दोन्ही संघांची कामगिरी पहिल्या दोन सामन्यात दर्जेदार झाली असून फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात कामगिरीत सातत्य दिसून आले आहे. या शेवटच्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघामध्ये बेअरस्टोच्या जागी बेन डकेतला संधी देण्यात आली आहे. इंग्लंड संघातील हॅरी ब्रुकला या सामन्यात कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकेल. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघातील वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत. दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व डीन एल्गारकडे सोपविण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेने आजपर्यंत ओव्हल मैदानावर 12 सामने खेळले असून त्यापैकी एकमेव विजय 2012 साली नोंदविला होता. या मालिकेतील पहिली कसोटी दक्षिण आफ्रिकेने एक डाव 12 धावांनी जिंकल्यानंतर इंग्लंडने दुसऱया कसोटीत आपल्या मागील पराभवाची परतफेड करत बरोबरी साधली आहे.