दोन्ही उपग्रह गेले चुकीच्या कक्षेत ः सेन्सर निकामी झाल्याची इस्रोकडून माहिती
श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) दोन्ही उपग्रहांचे रविवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. परंतु उपग्रहांचे सेन्सर निकामी झाल्यामुळे अवकाशात पाठविलेले ईओएस-02 आणि आझादीसॅट हे दोन्ही उपग्रह चुकीच्या कक्षेत गेल्याचे इस्रोने म्हटले आहे. आता या उपग्रहांचा काही उपयोग होणार नसल्याचा निर्वाळाही इस्रोने दिला आहे. दरम्यान, इस्रोने उपग्रहांच्या अपयशाची चौकशी करण्यासाठी एक समितीही स्थापन केली आहे.
इस्रोने रविवारी सकाळी 9.18 वाजता आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून आपले पहिले नवीन रॉकेट स्मॉल सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (एसएसएलव्ही) डी-1 प्रक्षेपित केले. या रॉकेटद्वारे आझादीसॅट उपग्रह पाठवण्यात आले. त्याचे 75 पेलोड देशभरातील 75 ग्रामीण सरकारी शाळांमधील 750 विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत. श्रीहरिकोटा येथे प्रक्षेपणाच्यावेळी डिझाइनिंग केलेल्या मुलीही उपस्थित होत्या. रॉकेटने दोन्ही उपग्रह अवकाशात नेले. मात्र त्यानंतर उपग्रहांकडून डेटा येणे थांबल्याचे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले. इस्रो मिशन कंट्रोल सेंटर डेटा लिंक मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. तथापि, दिवसअखेरपर्यंत प्रयत्नांना यश न आल्याने अवकाश मोहिमेला पुढे नेण्याच्या आशा मावळल्या.
छोटय़ा उपग्रहांसाठी नवा प्रक्षेपक
‘एसएसएलव्ही’ हे देशातील पहिले छोटे उपग्रह प्रक्षेपण वाहन आहे. पूर्वी आपण समकालिक कक्षेपर्यंत लहान उपग्रह ऐकण्यासाठी पीएसएलव्हीवर अवलंबून होतो. पीएसएलव्ही लाँचपॅडवर आणण्यासाठी आणि असेंबल करण्यासाठी दोन ते तीन महिने लागतात, तर एसएसएलव्ही अवघ्या 24 ते 72 तासांत असेंबल करता येते. यामुळे पैसा आणि वेळ दोन्ही वाचणार आहे. या प्रक्षेपकाचे उड्डाण यशस्वी ठरल्यामुळे भविष्यात छोटय़ा उपग्रहांसाठी त्याचा वापर करणे शक्य होणार आहे.
अवकाशात पाठविण्यात आलेले उपग्रह…
ईओएस-02 ः 500 किलोग्रॅमची कमाल वहनक्षमता असणाऱया रॉकेटने स्वतःसोबत पृथ्वी अवलोकन उपग्रह-02 (ईओएस-02) हा उपग्रह नेला. या उपग्रहाला पूर्वी मायक्रोसॅटेलाइट-2ए या नावाने ओळखले जात होते. याचे वजन सुमारे 142 किलोग्रॅम होते. ईओएस-02 हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह असून तो अंतराळात 10 महिने काम करणार होता. त्यात मध्यम आणि लांब तरंगलांबीचा इन्फ्रारेड कॅमेराही होता. त्याचे रिझोल्यूशन 6 मीटर इतके होते. तसेच तो रात्रीदेखील निरीक्षण करू शकत होता.
आझादीसॅट ः आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्त स्पेसकिड्स इंडियाचा ‘आझादीसॅट’ हा विद्यार्थी उपग्रहदेखील पाठवण्यात आला. हा उपग्रह सरकारी शाळांच्या 750 विद्यार्थ्यांनी निर्माण केला असून 8 किलोग्रॅमचा होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत याची निर्मिती करण्यात आल्याने या प्रकल्पाचे विशेष महत्त्व असल्याचे स्पेसकिड्स इंडियाने म्हटले आहे. 8 किलोग्रॅम वजनाच्या आझादीसॅट उपग्रहात 75 फेमटो एक्सपेरिमेंट आणि सेल्फी कॅमेरे देखील होते. हा उपग्रह सोलर पॅनेल आणि दीर्घ अंतराच्या दूरसंचार ट्रान्सपॉडरची छायाचित्रे घेण्यासाठी उपयुक्त मानला जात होता.