प्रतिनिधी/ सातारा
देशभरात सध्या बुलडोझर बाबाची जोरदार चर्चा आहे. शासकीय जागेत अतिक्रमण करुन जागा बळकावणाऱयांवर बुलडोझर बाबा बुलडोझर फिरवतोच हे अलिकडे गणित बनले आहे. त्यामुळे बुलडोझर बाबा फेमस झाले आहेत. सातारा शहरात अतिक्रमण बक्कळ वाढली आहेत. ती अतिक्रमण हटवण्याकरता आजपर्यंत दोन्ही नेत्यांपैकी एकानेही ठोस भूमिका घेतली नाही. उलट सुरु असलेली मोहिम बंद पाडण्यासाठी गेल्याचेच सातारकरांना ज्ञात आहे. त्यामुळे सातारच्या नेत्यांमध्ये बुलडोझर चालवण्याची ताकदच नाही, असा सवाल सर्वसामान्य सातारकर विचारु लागले आहेत.
सातारा शहरात एकही रस्ता असा नाही की जेथे अतिक्रमण झाले नाही. अगदी बसस्थानकापासून पोवई नाक्यापर्यंत, हुतात्मा स्मारकाचा परिसर, जुना आरटीओ ऑफिस चौक, जिल्हा परिषद चौकातून जाणारा रस्ता, राजवाडा परिसर, मोती चौक ते सदाशिव पेठ, गुरुवार परज, बुधवारनाका ते बसाप्पा पेठ या दरम्यान अतिक्रमण पहायला मिळतात. या अतिक्रमणाबरोबरच शहरात अनेक ठिकाणी तर अवैध बांधकामेही झाल्याचे निदर्शनास येईल. साताऱयाचे दोन्ही नेते गाडय़ा चालवण्यात पटाईत आहेत. अगदी भारीतल्या गाडय़ा सुसाट वेगाने दामटतील, ट्रक्टरही चालवल्याचे मध्यंतरी व्हिडीओ व्हायरल झालेले होते. परंतु दोन्ही नेत्यांमध्ये अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्याची ताकद नाही असा सवाल सर्वसामान्य सातारकर विचारु लागला आहे. नेत्यांचेच कार्यकर्ते दिसली मोकळी जागा की देतात टपरी टाकून अन् भाडे घेतात, अशी सातारकरांमध्ये चर्चा आहे. परप्रांतियांनी येथे येऊन त्यांनी त्याच भाडय़ाच्या खोक्यात व्यवसाय केला. ज्यांनी भाडय़ाची खोकी भाडय़ाने दिली त्यातील काही मंडळींनी त्यांना रेशनकार्ड, आधारकार्डही काढून दिली. त्यामुळे शहरात अनेक परप्रांतिय आता पक्के सातारकर बनले आहेत. परंतु जे मुळचे सातारकर आहे त्यांना अतिक्रमित साताकरांच्यामुळे त्रास होत असून त्या अतिक्रमणावर दोन्ही नेत्यांपैकी एकही नेता बुलडोझर फिरवत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पाठीमागे आघाडी सरकार असताना अजितदादा उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी जोरदारपणे शहरात पालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहिम सुरु होती. पालिकेचे अधिकारी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांपैकी एका नेत्याच्या कार्यकत्यांनी चक्क पालिकेच्या पदाधिकाऱयांना पळवून लावल्याचे साताकरांनी पाहिले होते. अन्य एका कारवाई वेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांना एका नेत्याने कारवाई बंद करायला भाग पडला. परंतु साताऱयातील दोन्ही नेत्यापैकी एकाही नेत्यास बुलडोझर चालवता येत नाही हे मात्र खरे अशीच सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.